 
						Inflation in India | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंगळवारी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी लाल किल्ल्यावरून तब्बल ९ वर्षानंतर महागाईचा मुद्दाही उपस्थित केला. विशेष म्हणजे २०१४ मध्ये महागाईला केवळ काँग्रेसला कारणीभूत ठरवणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी आज देशाला महागाईवर अनेक कारणं देताना महागाईची तुलना इतर देशातील महागाईशी केल्याने समाज माध्यमांवर प्रचंड टीका सुरु झाली आहे.
पंतप्रधान म्हणाले की, ‘भारतातील परिस्थिती इतर देशांच्या तुलनेत चांगली आहे, पण त्याचे समाधान होऊ शकत नाही. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी महागाईचा मुद्दा उपस्थित केला होता.
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ‘महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मागील काळाच्या तुलनेत आम्हाला काही प्रमाणात यश मिळाले आहे, परंतु यातून समाधान घेता येणार नाही. जगाशी आमची स्थिती चांगली आहे. एवढ्या गोष्टींचा आपण विचारच करू शकत नाही. देशवासियांवरील महागाईचा बोजा कमी व्हावा यासाठी मला या दिशेने अधिक पावले उचलावी लागतील. माझे प्रयत्न सुरूच राहतील.
जग महागाईच्या विळख्यात सापडले
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज संपूर्ण जग महागाईच्या संकटाशी झगडत असून महागाईने संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला ग्रासले आहे. “ज्या वस्तूंची गरज आहे ती आम्ही जगातूनही आणतो. आपण वस्तू आयात करतो तसेच महागाईही आयात करतो. संपूर्ण जग महागाईच्या विळख्यात सापडले आहे.
विरोधकांचा हल्लेबोल
महागाईच्या मुद्द्यावरून ही विरोधक भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडर, भाजीपाल्याचे दर, पेट्रोलचे वाढते दर अशा अनेक मुद्द्यांवर अनेक विरोधी पक्षनेते सरकारला प्रश्न विचारत आहेत.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		