लंडन: एडीएजी समुहाचे मालक एडीएजी समूहाचे अनिल अंबानी अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या अंबानींवर चीनच्या तीन बँकांनी ४८.५३ अब्ज रुपयांचा दावा ठोकला आहे. या बँकांनी सांगितले की अंबानींची बंद झालेली कंपनी रिलायन्स कम्युनिकेशनला २०१२ मध्ये ६६.०३ अब्ज म्हणजचे ९२.५२ कोटी डॉलरचे कर्ज दिले होते. या कर्जाची परतफेड न केल्याने २०१७ पासून बुडीत खात्यामध्ये आहे.
आर कॉमवर खटला दाखल करणाऱ्या बँकांमध्ये इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना, चायना डेव्हलपमेंट बँक आणि एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना आहेत. हा खटला लंडनच्या न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार तीन बँकांनी कर्ज देण्यापूर्वी अंबानींना तारण देण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी ते दिले नाही.
तत्पूर्वी, रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आपल्या लहान भावाला मोठ्या संकटातून वाचवले होते. एरिक्सन या कंपनीला देण्यासाठी पैसे नसल्याने अनिल अंबानी यांना तुरुंगवास भोगावा लागणार होता. परंतु मुकेश अंबानी यांनी अनिल यांच्यावरील ४६२ कोटींचे कर्ज फेडल्यामुळे त्यांच्यावरील अटकेचे संकट टळले होते. या कठीण प्रसंगात साथ दिल्याने अनिल अंबानी यांनी भाऊ मुकेश अंबानी आणि वाहिनी नीता अंबानी यांचे आभार मानले होते.
स्वीडनच्या एरिक्सन या कंपनीचे पैसे न दिल्यामुळे अनिल अंबानींच्या आरकॉमविरोधात सर्वोच्च न्यायालयाने धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने पैसे देण्यासाठी कालावधी ठरवून दिला होता. अखेर या तारखेच्या आतच अनिल अंबानी यांनी मोठ्या भावाच्या मदतीने एरिक्सनला ४६२ कोटी रुपये दिले. दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने आरकॉमच्या वायरलेस एसेटची ३,००० कोटी रुपयांना खरेदी केली होती. यामुळे कर्जातून सावरण्यास अनिल अंबानींच्या कंपनीला मोठा आधार मिळाला होता. म्हणून रिलायन्सची विभागणी झाल्यानंतर मुकेश अंबानी यांनी भावाच्या मदतीला धावून येण्याची ही दुसरी वेळ आहे.
