प्रिय,
कफ सायरप (लव्ह लेटर)
तसं तुझं अस्तित्व या जगात हजारो वर्षापासून आहे. त्यामुळे तू किती सदुपयोगी व गुणकारी आहेस याबाबत मी वेगळं सांगायलाच नको. अगदी माझ्या आज्जीच्या अशिक्षितपणातही तुझं रसायन कसं एकत्रित करुन गुणकारी ठरेल याचीही गणिते सहज सोडवलेली आहेत. तसं तुला रोज घ्यावं वाटतं पण दिवसातून तीनवेळा आणि ते ही फक्त दोन चमचे हे तुझे प्रमाण ठरलेले आहे. तुझ्या मिश्रणात विरघळून गेलेले जिंजर(अद्रक) म्हणजे माझ्या घश्याच्या आतल्या आत होणाऱ्या गळचेपीचे अगदी रामबाण उपायच!
पूर्वी तू पारंपरिक आणि सुसंस्कृत होतीस आता आधुनिक आणि फॅशनेबल झाली आहेस. तुझ्या गुणकारीपणाचे इफेक्टही आता साईड इफेक्ट झाले आहेत. दिवसातून तीनवेळा भेटणारी तू आता अगदी सकाळ संध्याकाळच भेटतेस आणि माझा गळा मोकळा करतेस! तसे या गळ्यावर बऱ्याच जणांचं प्रेम; म्हणून जो तो गळ्यात पडत राहतो. पण तू डगमगत नाही. खचत नाही. अगदी तटस्थपणे या गळ्यात पडलेल्या सर्व गोष्टींना तू कसबीने बाहेर काढते. तुझी चव पूर्वी कडवट होती ती आजही तशीच अबाधित आहे. बस्स! थोडा गोडव्याच्या भेसळीत तुझी गुणवत्ता ढासळली आहे. त्यात तुझे प्रतिस्पर्धी आणि तुझे उत्पादकही वाढलेत! हल्ली तुझी नवी फॅशन महागड्या मॉडेलसारखी झाली आहे. तू आहेस तशीच बरी आहेस. देखावे तुला शोभत नाही. तुला घेतल्याशिवाय रात्रीला चैनीची झोप येत नाही. तू आहेस तशीच राहा इतकंच माझ्या प्रेमाचं तुला मागणं आहे..!
तुझा प्रियकर
न थांबणारा खोकला..!
लेखक: पियुष खांडेकर
