ओठांवर हसू देणारी
हृदयाचा ठेका चुकवणारी
सत्यातून स्वप्नात रमणारी
क्षणातच मनात डोकवणारी …………………… होती एक स्वप्न वेडी !!

गालातल्या गालात हसणारी
डोळ्यांनीच बोलत राहणारी
पापण्यांच्या कडा भिजवणारी
सुखात दुखाला विसरणारी …………………… होती एक स्वप्न वेडी !!

लाटेसोबत खेळणारी
वाटेवर नजर खिळवणारी
पावलांशी पावले मिळवणारी
मनाशी मन जुळवणारी …………………………होती एक स्वप्न वेडी !!

स्वप्नातच स्वताला हरवणारी
सत्य हेच एक स्वप्न म्हणणारी
वास्तवात “स्व” हरवून बसणारी
कल्पनेतच मन रमवत राहणारी ……………….. होती एक स्वप्न वेडी !!

तुटतील तरी स्वप्न पाहणारी
तुटलेल्या स्वप्नांची कारणे शोधणारी
कशी पडतात ही स्वप्ने चांदणीला विचारणारी
अशाच एक स्वप्नात रोज भेटणारी…………………होती एक स्वप्न वेडी !!

तुझे स्वप्न माझेच
म्हणून भांडत राहणारी
विस्कटलेल्या आयुष्याचा खेळ
नव्याने मांडत राहणारी………………………….. होती एक स्वप्न वेडी !!

घरभर पसरलेले मोती
क्षणा-क्षणात वेचणारी
शब्द वेड्याच्या कविता
पाना-पानात वाचणारी…………………………….होती एक स्वप्न वेडी !!

 

लेखक: पियुष खांडेकर

!! होती एक स्वप्न वेडी !!