मुंबई ०८ ऑगस्ट | महाराष्ट्राच्या इतिहासात असे अनेक समाजसुधारक होऊन गेले ज्यांच्यामुळे देशाला एक नवीन दिशा मिळाली आणि त्यापैकी एक म्हणजेच महादेव गोविंद रानडे, ज्यांनी आपल्या उदारमतवादी, धर्मसुधारक वृत्तीने समाजाला नवीन वळण दिले. अशा या तेजस्वी व्यक्तिमत्वाची ओळख करून घेऊया.

महादेव गोविंद रानडे ह्यांना माधवराव म्हणत असत. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यात निफाड गावी झाला. लहानपणापासूनच ते सहिष्णू, शांत, उदार, होते. १८६२ रोजी ते बी. ए च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. इतिहास आणि अर्थशास्त्र घेऊन पुन्हा बी.ए. (ऑ ) परीक्षा दिली. १८६४ साली एम. ए ची परीक्षा दिली आणि १८६५ साली कायद्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. १८६८ साली मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली.

पुण्यास न्यायखात्यात १८७१ पासून न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झाली. काही काळ काम केल्यावर १८९३ साली त्यांना मुंबईच्या उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची जागा मिळाली. महादेव गोविंद रानडे यांचे दोन विवाह झाले होते. प्रथम पत्नी वारल्यावर दुसरा विवाह रमाबाई यांच्याबरोबर झाला. त्यानंतर त्यांनी अनेक चळवळीत सहभाग घेतला होता. १८६५ साली विधवाविवाहोत्तेजक मंडळाची स्थापना त्यांनी केली.

समाजकारणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस व सामाजिक परिषद या दोन संस्था निर्मिल्या. राजकीय सुधारणा, आर्थिक सुधारणा, धर्म सुधारणा आणि समाजसुधारणा ह्यांना त्यांनी अधिक महत्व दिले. रानडे यांनी १८७० मध्ये स्थापलेल्या पुण्यातील ‘सार्वजनिक सभा ‘ या संस्थेमध्ये दोन फाटाफूट झाली, दोन गट झाले. तेव्हा त्यांनी १८९३ रोजी पुण्यात ‘डेक्कन सभा ‘ ही नवीन संस्था स्थापन केली. रानड्यांनी आपल्या देशांत औद्योगिक क्रांती व्हावी म्हणून संरक्षक जकातीचे तत्व पुरस्कारिले. अशा प्रकारे त्यांनी देशाच्या प्रत्येक घटकाचा विचार करून अनेक पावले उचलली आणि देशाला नवीन दिशा दिली.

महाराष्ट्रात १८७४ ते ७६ या कालखंडात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा सार्वजनिक सभेद्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचे सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणात सरकारचे धोरणच शेतकऱ्यांच्या हलाखीस कारण आहे, असे स्पष्ट केले. जनतेला जबाबदार राज्यपद्धती प्राप्त झाल्याशिवाय सामान्य जनतेची आर्थिक स्थिती सुधारणार नाही, असा मुद्दा धरून जबाबदार राज्यपद्धतीच्या मागणीचा अर्ज इंग्लंडच्या पार्लमेंटकडे धाडून दिला. या अर्जावर हजारो लोकांच्या सह्या होत्या. १८७७ मध्ये दिल्ली येथे भरलेल्या दरबारात राणी व्हिक्टोरिया हिला हिंदुस्थानची सम्राज्ञी ही पदवी अर्पण करण्यात आली. त्या प्रसंगी सार्वजनिक सभेतर्फे राणीला एक मानपत्र दिले आणि त्याबरोबर हिंदी जनतेच्या मागण्यांचा अर्जही दिला.

रानड्यांच्या या राजकारणाच्या पाठीमागे अखेर बंड उठविण्याचाही उद्देश असावा, अशी त्यावेळी ब्रिटिश सरकारला दाट शंका उत्पन्न झाली. रानड्यांच्या सर्व व्यवहारांवर सरकारने कडक लक्ष ठेवले; परंतु स्पष्ट असा पुरावा उपलब्ध न झाल्यामुळे १८८५ साली रानडे यांना कौन्सिलचे सभासद म्हणून नेमले व फायनान्स कमिटीत घेतले. १८८५ साली काँग्रेसची स्थापना झाली. या स्थापनेच्या कार्यात रानड्यांचा मोठा भाग होता. गोपाळ कृष्ण गोखले यांनी राजकारणात रानडे यांचा ध्येयवाद व धोरण स्वीकारले. गोखले यांनी १९०० साली केलेल्या एक भाषणात म्हटले आहे, की ‘मी रानडे यांच्या पायापाशी शहाणपण शिकलो आहे’.

रानड्यांनी १८९० साली औद्योगिक परिषद स्थापली. त्यावेळच्या प्रास्ताविक भाषणात आणि त्यानंतरच्या भाषणांमध्ये त्यांनी हिंदी अर्थशास्त्रावर अनेक उद्‌बोधक व्याख्याने दिली. कंगाल हिंदुस्थानला स्वतंत्र अर्थशास्त्र असावे, असे त्यांनी प्रतिपादिले. मराठी साहित्य संमेलनाची गंगोत्री ठरलेल्या पहिल्या मराठी ग्रंथकार संमेलनाचे (११ मे १८७८) न्यायमूर्ती रानडे हे अध्यक्ष होते.

साधारणपणे १८९४ पासून पुढील पाच-सहा वर्षे न्या. रानड्यांनी विविध संस्था आणि सभांतून मराठ्यांच्या इतिहासासंबंधी आपले शोधनिबंध वाचले होते. ते पुढे ‘राइझ ऑफ द मराठा पॉवर अँड अदर एसेज’ [म. शी. मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष (१९६४)] या पुस्तकात संग्रहित करण्यात आले. या लेखनाला जोडूनच मराठी सत्तेचा विस्तार आणि ऱ्हास या संबंधीही पुढील दोन खंड लिहिण्याचा त्यांचा मानस होता; परंतु त्यांच्या निधनामुळे (१९०१) तो पूर्ण होऊ शकला नाही. स्वकीयांच्या दृष्टिकोनातून मराठ्यांच्या इतिहासाची वैशिष्ट्ये निःपक्षपातीपणे सादर करणे व यूरोपीय इतिहासकारांच्या लेखनामुळे त्यासंबंधी निर्माण झालेले अपसमज दूर करणे, हा या लेखनामागील मुख्य हेतू होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Story Title: Mahadev Govind Ranade information in Marathi news updates.

थोर समाजसुधारक महादेव गोविंद रानडे