वॉशिंग्टन : बिल गेट्स यांचे मित्र आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे ६५ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले आहे. मागील अनेक वर्ष ते कर्करोगाने त्रस्त होते. अॅलन यांनी त्यांचे लहापणीचे मित्र बिल गेट्स यांच्यासोबत जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. अॅलन यांची कंपनी व्हल्कन इंकने याबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे.
पॉल अॅलन क्रीडा रसिक सुद्धा होते. पोर्टलँड ट्रेल ब्लेजर्स आणि सिएटल सिहॉक्सचे प्रमुख होते. १९७५ मध्ये एकत्र येत अॅलन आणि बिल गेट्स या दोन मित्रांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. १९८० मध्ये स्थापन झालेली मायक्रोसॉफ्ट कंपनी सॉफ्टवेअर जगतातील प्रतिष्ठित कंपनी म्हणून पुढे आली. दरम्यान, आयबीएम कंपनीने सुद्धा पर्सनल कॉम्प्युटर क्षेत्रात प्रथमच प्रवेश करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. त्यानंतर आयबीएमने मायक्रोसॉफ्टला पर्सनल कॉम्प्युटरसाठी महत्वाच्या ऑपरेटिंग सिस्टिम पुरवण्याचे काम दिले होते. त्यानंतर त्यांचं जगच पालटलं होत.
त्याच निर्णयामुळे आज मायक्रोसॉफ्ट ही अमेरिकन कंपनी सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानात जगात अव्वल स्थानी पोहोचली. आज अॅलन आणि गेट्स हे दोघेही अब्जाधीश म्हणून परिचित आहेत. कालांतराने दोघाही मित्रांनी स्वतःला समाजकार्याशी जोडून घेतले होते. दोघांनी अनेक स्वयंसेवी संस्था स्थापन करुन जगभरात विविध विकासकामांना त्यामार्फत निधी पुरवला.
