अहमदाबाद: स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू स्वामी नित्यानंद देश सोडून पळाला असल्याची माहिती गुजरात पोलिसांनी गुरुवारी दिली. नित्यानंद आणि त्याच्या दोन शिष्यांविरोधात पोलिसांकडून पुराव्यांची जमावजमव सुरू आहे. बुधवारी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर अपहरण आणि मुलांचा गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल आहे.

नित्यानंद विदेशात परागंदा झाले आहेत, गरज पडल्यास गुजरात पोलीस योग्य कारवाई करून त्यांची कोठडी मिळवेल. नित्यानंद कर्नाटकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर देशातून पळून गेले आहेत. त्यांना शोधणं म्हणजे वेळेचा अपव्यय करण्यासारखं आहे. भारतात आल्यानंतर त्याला अटक करण्यात येईल, असंही अहमदाबाद पोलिसांनी सांगितलं आहे.

तत्पूर्वी एप्रिल २०१० मध्ये सेक्स स्कँडलप्रकरणी नित्यानंद स्वामी याला अटक झाली होती. हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील अर्की इथे ही अटक करण्यात आली होती. हिमाचल पोलीस आणि कर्नाटक पोलिसांनी संयुक्तपणे ती कारवाई केली होती आणि नित्यानंदला चंदीगड कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तेव्हापासून नित्यानंद स्वामी अनेक गंभीर प्रकरणी चर्चेत आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी नित्यानंद स्वामींचा अनेक कार्यक्रमांना हजेरी लावून आशीर्वाद घेतले होते.

त्यावेळी देखील नित्यानंदाचा अटके आधी पोलीस अनेक ठिकाणी छापे मारत होते. त्यावेळी देखील आश्रमच्या वेबसाईटवर सांगण्यात आलं होतं की, स्वामी नित्यानंद लवकरच समोर येतील. त्यानंतर एका तमिळ टीव्ही चॅनलवर नित्यानंद स्वामी आणि एक अभिनेत्री हे ‘नको त्या अवस्थेत’ दाखवण्यात आले होते. त्यामुळे २०१० मध्ये नित्यानंद स्वामी गायब झाले होते. कर्नाटक पोलिसांनी हिमाचल प्रदेशातून अटक केली होती.

दरम्यान, अहमदाबाद ग्रामीण पोलीस उपअधीक्षक केटी कमरिया यांनी सांगितलं की, आम्ही नित्यानंदच्या आश्रमात सर्च ऑपरेशन राबवलं आहे. तिथून आम्ही ४ लॅपटॉप, ४३ टॅबलेट, पेन ड्राइव्ह आणि अनेक मोबाईल फोन्स बंद केले आहेत. सध्या आम्ही नित्यानंद यांचा शोध घेत नाही आहोत. पहिल्यांदा आम्ही अटक केलेल्या त्यांच्या महिला अनुयायांकडे चौकशी करून पुरावे गोळा करू, त्यानंतरच पुढील कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

योगिनी सर्वज्ञपीठम आश्रमाच्या ९ आणि १० वर्षांच्या दोन मुलांना त्रास दिला जात होता, तसेच बाल मजूर म्हणून त्यांच्याकडून काम करून घेतली जात होती. शहरातल्या एका फ्लॅटमध्ये त्यांना १० दिवसांहून अधिक काळ बंधक बनवून ठेवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे त्या दोन मुलांनीही अशाच प्रकारचा आरोप केला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डा (सीबीएसई)ने अहमदाबादमध्ये नित्यानंद आश्रमासाठी शाळेची जमिनी कोणाच्याही परवानगीशिवाय दिल्यानं गुजरात शिक्षा विभागाकडे एक रिपोर्ट मागितली आहे. बोर्डाची परवानगी न घेता स्वामी नित्यानंद आश्रमाला डीपीएस मणिनगर, अहमदाबादची जमीन देण्यासंद्रभात चौकशी करण्यासाठी राज्य शिक्षा विभागाला पत्र लिहिलं आहे.

कर्नाटकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल; स्वामी नित्यानंद देश सोडून पळाला