
ITR Filing Penalty | कोणत्याही दंडाशिवाय प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत संपली आहे. यंदा ३१ जुलैपर्यंत २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ६.५० कोटींहून अधिक आयकर विवरणपत्रे दाखल करण्यात आली आहेत. मुदत संपल्यानंतर जर तुम्ही रिटर्न भरणार असाल तर तुम्हाला 5000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. मात्र, काही करदात्यांना अजूनही दंडाचा त्रास होणार नाही.
कोणाला दंड भरावा लागणार नाही?
प्राप्तिकर कायद्यानुसार मुदत संपल्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी प्रत्येकाला विलंब शुल्क भरावे लागत नाही. ज्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा जास्त नसेल आणि मुदत संपल्यानंतर आयटीआर दाखल केला तर त्याला दंड भरावा लागणार नाही.
सध्या एखाद्या व्यक्तीला लागू असलेली मूलभूत करसवलत मर्यादा त्याने निवडलेल्या कर प्रणालीवर अवलंबून असते. जर एखाद्या व्यक्तीने नवीन कर प्रणालीचा पर्याय निवडला तर मूळ सूट मर्यादा 2.5 लाख रुपये असेल. या प्रणालीत सर्व वयोगटातील लोकांसाठी समान सूट आहे.
जुन्या करप्रणालीत काय नियम आहेत?
तथापि, जर एखाद्या व्यक्तीने जुन्या कर प्रणालीचा पर्याय निवडला तर मूळ सूट मर्यादा त्याच्या वयावर अवलंबून असते. सध्या ६० वर्षांखालील करदात्यांसाठी मूळ सूट मर्यादा २.५ लाख रुपये आहे. 60 वर्षांवरील परंतु 80 वर्षांपेक्षा कमी वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सूट मर्यादा 3 लाख रुपयांपर्यंत आहे. अत्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी (८० वर्षांवरील) मूळ सूट मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत आहे.