पुणे : लोकसभा निवडणुकीत जातीसाठी नाही तर आपल्या मातीसाठी मतदान करा, असं म्हणत एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शिरूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना साथ देण्याचं जाहीर आवाहन मतदाराला केलं आहे. शरद पवार यांनी आपल्या या विधानातून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना देखील अप्रत्यक्षरित्या टोला हणाला आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसर इथं अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत शरद पवारांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. तसेच मोदींच्या होऊ घातलेल्या सभेचा फायदाच होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मागीलविधानसभेला नरेंद्र मोदींनी बारामतीत सभा घेतली आणि अजित पवार १ लाख मतांनी निवडून आले. त्याआधी ते ६० ते ६५ हजाराच्या मताधिक्याने निवडून यायचे. आतादेखील नरेंद्र मोदी बारामती लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. त्यामुळे मला अजिबात चिंता नाही. उलट आता आमचा उमेदवार लाखांच्या फरकाने निवडून येणार,’ असं म्हणत शरद पवार यांनी मोदींच्या संभाव्य बारामती दौऱ्याची खिल्ली उडवली आहे.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		