 
						CIBIL Credit Score | जर तुम्ही बँकेकडून कर्ज हवे असेल, तर तुमचा CIBIL स्कोअर चांगला असणे खूप गरजेचे आहे. नाहीतर तुमचा कर्जाचा अर्ज बँक नाकारू शकतो. सध्याच्या काळात महागाई इतकी वाढली आहे की, केवळ बचत करून तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही. घर खरेदी करताना किंवा नवीन घर बांधताना, कार खरेदी करताना, शिक्षणासाठी, वैद्यकीय गरजेच्या परिस्थितीत लोकांना बँकेतून किंवा इतर कोणाकडून तरी कर्ज घ्यावे लागते. असे अनेक अडचणीचे प्रसंग आपल्या आयुष्यात येत असतात.
जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर चागला आहे की हे तुम्ही तपासले पाहिजे. तुमचा क्रेडिट स्कोअर तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही किंवा किती कर्ज द्यायचे हे ठरवते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, कर्ज मिळविण्यासाठी तुमची पात्रता आहे की नाही, किंवा तुमची कर्ज परतफेडीची क्षमता आहे की नाही, हे ठरवण्यात तुमचा क्रेडिट स्कोअर खूप महत्वाची भूमिका बजावत असतो. जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला क्रेडिट स्कोअरशी संबंधित या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे खूप गरजेचे आहे.
तुमचा क्रेडिट स्कोअर कसा ठरवला जातो?
क्रेडिट स्कोअरला आर्थिक भाषेत CIBIL स्कोअर असेही म्हणतात . हा स्कोअर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या मागील क्रेडिट रेकॉर्डच्या अहवालाच्या आधारे तयार केला जातो. क्रेडिट स्कोअर ठरवताना, तुम्ही आजपर्यंत किती कर्ज घेतले आहे, ते वेळेवर फेडले की नाही, किती कर्ज बुडवले, हे सर्व तपासले जाते. तुमचा क्रेडिट स्कोअर जितका जास्त असेल, तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता तेवढी जास्त वाढेल.
क्रेडिट स्कोअर कोण ठरवतो?
भारतात अश्या अनेक क्रेडिट ब्युरो संस्था आहेत, जे तुमचा क्रेडिट स्कोर जारी करत असतात. यामध्ये TransUnion CIBIL, Equifax, Experian आणि CRIF Highmark यासारख्या क्रेडिट माहिती गोळा करणाऱ्या कंपन्यांचा समावेश होतो. ह्या क्रेडिट संस्था तुमच्या क्रेडिट डेटावर आधारित एक क्रेडिट अहवाल तयार करतात. ह्या क्रेडिट अहवालाच्या मदतीने तुमचे क्रेडिट स्कोअर ठरवले जाते. क्रेडिट स्कोअर 300 ते 900 अंकांच्या दरम्यान निश्चित केला जातो. साधारणपणे 750 पेक्षा अधिक क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो.
कमी क्रेडिट स्कोअरचे परिणाम :
असे बरेच लोक असतात, ज्यांनी आपल्या आयुष्यात कधीही कर्ज घेतलेले नसते, किंवा ते क्रेडिट कार्ड देखील वापरत नाहीत. अश्या लोकांचा क्रेडिट स्कोअर नसतो. आणि त्यांना कर्ज मिळणे अवघड जाते. जर समजा तुम्ही कोणत्याही आर्थिक संस्थेकडून कधीही कर्ज घेतले नसेल आणि तुमच्याकडे क्रेडिट कार्डही नसेल, तर कर्जाचा अर्ज स्वीकारताना तुम्हाला जोखीम श्रेणीत टाकायचे की नाही हे क्रेडिट डेटा कंपन्यांना कळत नाही. जर तुमच्याकडे कोणताही क्रेडिट स्कोअर नसेल, किंवा कोणताही क्रेडिट डेटा नसेल, तर अनेक वित्तीय संस्था तुम्हाला कर्ज देण्यास नकार देऊ शकतात.
क्रेडिट स्कोअर कसा सुधारायचा :
* तेवढेच कर्ज घ्या, ज्याचे हप्ते वेळेवर भरता येतील.
* आर्थिक क्षमतेनुसार कर्ज घ्या, आणि वेळेवर EMI भरा.
* क्रेडिट कार्डचा अती वापर टाळा आणि क्षमतेपेक्षा अधिक वैयक्तिक कर्ज घेऊ नका.
* गरज असेल त्याच वेळी कर्ज घ्या.
* किरकोळ खर्चासाठी कर्ज घेऊ नका, कर्ज फक्त अडचणीच्या वेळेतच घ्यावे आणि वेळेवर फेडावे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		