 
						Vedanta Share Price | शेअर बाजारातील घसरणीदरम्यान सोमवारी प्रसिद्ध उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या वेदांतासह धातू क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय घसरण झाली. निफ्टी मेटल निर्देशांकात सर्वाधिक घसरण नोंदविण्यात आली असून, सध्या तो ३ टक्क्यांहून अधिक घसरणीसह व्यवहार करत आहे.
या निर्देशांकात समाविष्ट असलेले सर्व १५ मुख्य शेअर्स सध्या घसरणीसह व्यवहार करीत आहेत. वेदांताच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे ७ टक्क्यांची घसरण दिसून आली आणि बीएसईवर या शेअरने इंट्राडे नीचांकी स्तर ४१० रुपयांवर पोहोचला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसह अनेक देशांवर कर लावण्याची घोषणा केल्यानंतर डॉलर निर्देशांकात वाढ झाल्यानंतर वेदांतासह धातू क्षेत्राच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. त्याचबरोबर लंडन मेटल एक्स्चेंजवरही बेस मेटलच्या किमतीत घसरण झाल्याने मेटल काऊंटरच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
धातू संबंधित शेअर्समध्ये मोठी घसरण
धातू क्षेत्रातील वेदांता, नाल्को आणि एनएमडीसीच्या शेअर्समध्ये प्रत्येकी ६ ते ७ टक्क्यांची घसरण दिसून आली. दरम्यान, टाटा स्टील, जिंदाल स्टेनलेस, हिंद कॉपर, हिंडाल्को आणि सेल चे शेअर्स ३ ते ५ टक्क्यांनी घसरले. डॉलर निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक वधारला आणि 110 च्या पातळीवर पोहोचला. डॉलर निर्देशांकातील वाढ सामान्यत: भारतासह नॉन-डॉलर मूल्यांकित देशांमधील धातू कंपन्यांसाठी अडचणीचे संकेत देते.
ट्रम्प यांनी चीनसह तीन देशांवर शुल्क लादले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीन, कॅनडा आणि मेक्सिको या तीन प्रमुख देशांवर कर लादल्याने प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये ‘ट्रेड वॉर’ची चिंता वाढली आहे. ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोमधून होणाऱ्या आयातीवर २५ टक्के, तर चिनी आयातीवर १० टक्के शुल्क लादले होते. चीन हा जगातील सर्वात मोठा धातू आयातदार देश आहे, त्यामुळे देशाशी संबंधित कोणत्याही व्यापार तणावामुळे धातूंच्या जागतिक मागणीवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो, ज्याचा परिणाम भारतीय कंपन्यांवरही होईल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		