मुंबई: तर्कशून्य अंदाज बांधण्यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा हात कोणीही पकडू शकत नाहीत. मुंबई आणि कोकणात सेव्ह आरे आणि नाणार प्रकल्पबाधितांची आंदोलनं प्रचंड गाजली. सदर आंदोलनं लोकशाही मार्गाने केली होती आणि ती निसर्गाच्या भल्यासाठीच होती हे देखील सर्वश्रुत आहे. परंतु, याच आंदोलकांवर युती सरकार असताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते.

मात्र त्यानंतर देखील ठोकशाही पद्धतीने आंदोलनं दडपण्याचे प्रकार करून संबधित आंदोलकांवर गंभीर गुन्हे नोंदवून सरकारने स्वतःच्या ठोकशाही पद्धतीचा नमुना सादर केला होता. त्यानंतर फडणवीस सरकार विरोधात प्रचंड संताप खदखदत होता. दरम्यान, राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता जाऊन आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैत्रुत्वात शिवसेना, राष्टवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडील अधिकारांचा वापर करत लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या सामान्य नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले, ज्याचं सर्वच थरातून स्वागत होताना दिसत आहे. मात्र, सूड भावनेने पेटलेले भारतीय जनता पक्षाचे नेते काहीही बरळण्यास सुरु झाल्याचं चित्र आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेड आणि नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचा आदेश नुकताच दिला आहे. परंतु यामुळे विरोधी पक्षात असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. गुन्हे मागे घेण्याचा हंगाम सध्या सुरु असून…घाई करा थोडेच दिवस बाकी आहेत असा टोला भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे सरचिटणीस मोहित भारतीय यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी आता दाऊदलाही क्लीन चीट मिळेल असाही टोला लगावला आहे.

मोहित भारतीय यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “सूत्र: दाऊदवरील सर्व गुन्हे मागे घेतले जाण्याची शक्यता आणि लवकरच महाराष्ट्र सरकारकडून क्लीन चीट देणार आहे. कारण सध्या गुन्हे मागे घेण्याचा हंगाम सुरु आहे. घाई करा…थोडेच दिवस बाकी आहेत”. दरम्यान, मोहित कुंभोज यांनी आरे आणि नाणार संबधित आंदोलकांवरील गुन्ह्यांची तुलना आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम’वरील गुन्ह्यांशी केल्याने संताप व्यक्त करण्यात येतो आहे.

भाजपच्या नेत्याकडून आरे-नाणार आंदोलकांवरील गुन्ह्यांची तुलना दहशतवादी दाऊद’वरील गुन्ह्यांशी