मुंबई: राज्य सरकारच्या गृहखात्याने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा स्वीकारला आहे. प्रदीप शर्मा हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते. प्रदीप शर्मा यांनी जुलै महिन्यातच तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यानंतर ते निवडणूक लढवू शकतात अशीही चर्चा रंगली होती. आता एएनआयनेही ही शक्यता वर्तवली आहे. प्रदीप शर्मा येत्या विधानसभा निडवणुकीत निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचं एएनआयने म्हटलं आहे.

सध्या वसई-विरार भागातील ठाकूर कुटुंबाची असलेली एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी शिवसेनेकडून प्रदीप शर्मा यांना नालासोपारा मतदार संघातून क्षितीज ठाकूर यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहे. दरम्यान, १९८३ साली पोलीस सेवेत रूजू झालेले प्रदीप शर्मा हे घाटकोपर आणि माहिम ही दोन पोलीस स्टेशन वगळता आपला बहुसंख्य काळ मुंबई गुन्हे शाखा आणि स्पेशल टास्क फोर्समध्येच कार्यरत होते.

२००८ मध्ये त्यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर नऊ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ऑगस्ट २०१७ मध्ये पुन्हा ते पोलीस सेवेत परतले होते. त्यानंतर ठाणे क्राइम ब्रांचमध्ये कार्यरत होते.

राजीनामा मंजूर; एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा सेनेकडून निवडणूक लढवण्याची शक्यता