नवी दिल्ली : आधीच अनिल अंबानी आणि राफेल करारावरून मोदी सरकार अडचणीत आले असताना, त्याचा धसका घेऊन केंद्राने अदानी गृप सोबत रायफलची निर्मिती करु पाहणाऱ्या रशियाचा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. लढाऊ विमान बांधणीचा कोणताही पूर्व अनुभव नसताना अनिल अंबानींच्या कंपनीला राफेल विमानांच्या निर्मितीचं कंत्राट मिळाल्याने विरोधकांनी मोदी सरकारला अडचणीत आणले होते.
भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन लवकरच रशियाचा दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. या दौऱ्यादरम्यान क्साशनिकोव-१०३ रायफलचं उत्पादन भारतातच करण्याबद्दल चर्चा होऊन दोन देशांमध्ये सामंजस्य करार केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, संबंधित रायफल निर्मिती करणारी रशियन कंपनी अदानी समूहासोबत भागिदारी करण्यास उत्सुक आहे. परंतु राफेल करार आणि अनिल अंबानी प्रकरणावरून मोदी सरकार अडचणीत आले असल्याने, केंद्राने अदानींना या करारापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
वास्तविक, दोन देश एकमेकांसोबत सामंजस्य करार करत असताना दोन्ही देशांपैकी एकाही देशाचं सरकार स्वतःच्या देशातील खासगी क्षेत्रातील कंपनीचं नाव सुचवू शकत नाही आणि तसा नियम सुद्धा आहे. नेमका त्याचाच उद्धार घेत केंद्रातील मोदी सरकारने रशियाचा प्रस्ताव फेटाळला आहे असे वृत्त आहे.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		