मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई कॉग्रेसससुद्धा कामाला लागली असताना अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याची शक्यता आहे. मुंबई काँग्रेसमध्ये संजय निरुपम यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या अनेक माजी खासदार आणि आमदारांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, माजी खासदार मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या एकूण कार्यपद्धतीवरच मिलिंद देवरा, कृपाशंकर सिंग, नसिम खान आदी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळूनच प्रिया दत्त यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला. मिलिंद देवरा यांनी सुद्धा निवडणूक लढविण्याबाबत वेगळी भूमिका व्यक्त केली आहे. मुंबई काँग्रेसमधील वादावर नाराजी व्यक्त करतानाच देवरा यांनी, पक्षाचे नेतृत्व योग्य निर्णय घेईल, असे मत व्यक्त केले आहे.

दरम्यान,काँग्रेस पक्षांतर्गत वाद टाळण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्व नेत्यांनी एकत्र यावे, असे माझे मुंबईतील काँग्रेस नेत्यांना आवाहन आहे, असे ट्वीट देवरा यांनी केले आहे. ‘निवडणूक जिंकण्यासाठी साऱ्यांनी एकत्र यावे, असे माझे सर्वानाच सांगणे आहे. देवरा यांनी व्यक्त केलेली भावना योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया संजय निरुपम यांनी व्यक्त केली आहे.

former congress mp milind deora criticizes sanjay nirupam