बेंगळुरू: देशातील महत्वाची आणि २०१९ ची दिशा ठरवणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर तब्बल १०,००० कोटी रुपये खर्च झाले आहेत. सर्वच राजकारण्यांनी या निवडणुकीवर प्रचंड पैसा खर्च केला आहे.
परंतु कर्नाटक निवडणूक ही त्याबाबतीत सर्वाधिक महागडी ठरली आहे. या निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि सर्वच पक्षांनी व उमेदवारांनी पाण्यासारखा पैसा ओतला होता. कर्नाटक निवडणुकीचा सेंटर फॉर मीडिया स्टडीजने याचा एक सर्व्हे केला आहे, त्यात ही बाब उघड झाली आहे.
त्यानुसार कर्नाटक विधानसभेत तब्बल ९५०० ते १०,५०० कोटी इतका प्रचंड पैसा खर्च करण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत हा खर्च अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. तरी यात पंतप्रधानांच्या रॅलींवर झालेल्या खर्चाचा समावेश नाही.
आंध्रप्रदेशा व तामिळनाडूपेक्षाही हा खर्च अधिक असून, कर्नाटक निवडणुकीत उमेदवारांच्या व्यक्तीगत खर्चात तब्बल ७५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहणीतून समोर आलं आहे. तसेच देशात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल ५०,००० ते ६०,००० कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत तब्बल ३०,००० कोटी रुपये खर्च करण्यात आला होता असं सीएमएसचे के. एन. भास्करराव यांनी सांगितलं.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		