मुंबई : पाडव्याच्या मुहूर्तावर आज ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या नव्या मराठा समाजाच्या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्याची अधिकृत घोषणा सुरेश पाटील यांनी केली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आम्ही राजकीय पक्षाची स्थापना करत असल्याचं सुद्धा ते म्हणाले.
मागील अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासह विविध मागण्यासाठी ‘एक मराठा…लाख मराठा’ अशा घोषणा देत रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. परंतु आरक्षणाच्या बाबतीत परिस्थिती जैसे थे असल्याने आणि सरकारकडून काहीच हालचाल होत नसल्याने अखेर मराठा समाजाच्या पक्षाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, मराठा समाजाच्या अनेक मागण्यांसाठी स्वतंत्र पक्षस्थापन करण्यासंदर्भात सप्टेंबर महिन्यात मेळावा पार पडला होता. त्यावेळी मेळाव्यात राजकीय पक्षाची स्थापना करावी लागणार, अशी घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आज पाडव्याच्या मुहूर्तावर राजकीय पक्षाची घोषणा करण्यात आली आहे आणि महाराष्ट्र क्रांती सेना असे या पक्षाचे नाव आहे. परंतु, स्वतंत्र पक्ष स्थापनेस मराठा समाजातील अनेकांचा तीव्र विरोध होता. तरी सुद्धा या विरोधाला डावलून अखेर पक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
