नवी दिल्ली : सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. त्यासाठी सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. कोणतीही निवडणूक जिंकायची म्हटल्यावर केवळ पक्षाची मोठी नेतेमंडळी मतदाराला माहित असून चालत नाही, तर त्या आवडत्या नेत्याचं किंवा त्या पक्षाचं निवडणूक चिन्ह कोणतं आहे, हे सुद्धा माहित असणं अत्यंत गरजेचं असतं. कारण संबंधित पक्षाचा आवडता नेता किंवा अध्यक्ष माहित आहे, परंतु त्याच्या पक्षाचं चिन्हच जर चाहत्या मतदाराला माहित नसेल तर सर्वच शून्य आहे.
भाजपाची मागील ४-५ वर्षातील राजकीय रणनीती पाहता, त्यांचे मार्केटिंग आणि पार्टी प्रमोशन सल्लागार हे खरंच अनुभवी आणि मास्टर असल्याचेच मान्य करावं लागेल. नरेंद्र मोदी आणि इतर वरिष्ठ मोठ्या नेत्यांचे कितीही चाहते किंवा तिरस्कार करणारे मतदार असले तरी ते प्रेम आणि तिरस्कार करत असलेल्या त्या नेत्याचं किंवा पक्षाचं चिन्ह ‘कमळ’ आहे, हे त्यांना निश्चित पणे माहित आहे. त्याला कारण म्हणजे स्वतः नरेंद्र मोदी असो किंवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे संधी मिळेल तिथे न लाजता ‘कमळ’ मिरवताना दिसतात. अगदी चिमुकल्या मुलांसोबत जरी मोदींनी एखादा सेल्फी काढला, तरी त्यात सुद्धा ते स्वतः हळूच कमळाचं फुल हातात धरतात किंवा हळूच त्या मुलांच्या हातात कमळ देताना, अनेक वेळा दिसले आहेत. कारण तोच त्यांचा उद्याचा ग्राहक म्हणजे मतदार असणार आहे आणि त्याला आतापासूनच कमळाची तोंड ओळख करून दिली जात आहे.
मार्केटिंगच्या भाषेत त्याला ब्रँड अवेअरनेस बोलतात. त्यामुळे भाजपच्या प्रत्येक पत्रकार परिषदेत पाठीमागील पक्षाचं चिन्ह असलेले फ्लेक्स, हातातील पक्ष चिन्ह असलेला माईक, पत्रकार परिषदेतील टेबल ते थेट टीव्हीवरील प्रत्येक इव्हेंटला मोदींपासून ते मोठे नेते मंडळी न लाजता कुरत्याच्या खिशाला कमळ लावूनच असतात. कारण प्रसार माध्यमांवर त्या चिन्हाचा फुकट प्रचार होत असतो. आता पत्रकार परिषदेत पाठीमागील पक्षाचं चिन्ह असलेले फ्लेक्स, हातातील पक्ष चिन्ह असलेला माईक, पत्रकार परिषदेतील टेबलवर पक्ष चिन्ह आणि थेट टीव्हीवर उपस्थित राहणाऱ्या पक्ष नेत्याच्या खिशाला पक्ष चिन्ह लावायला करोडो रुपये लागतात असं जर कोणी समजत असेल तर त्याला मूर्खच समजाव लागेल. त्याउलट निवडणुकीच्या मुख्य प्रचाराच्या दिवसात लागणार पारंपरिक साहित्य हे कितीतरी खर्चिक असतं. परंतु, आयत्या निवडणुकीच्या वेळी “ताई माई आक्का, विचार करा पक्का आणि कमळावर मारा शिक्का” यावर अवलंबून न राहता, भाजपने ‘कमळाचा’ प्रचार हा एक मोठी प्रक्रिया समजून त्याला संपूर्ण सत्ताकाळात अंमलात आणलं.
अर्थात अशा प्रकारे पक्ष चिन्हाचं ब्रँड अवेरनेस करण्यासाठी इतर पक्षांना कोणी रोखलं नव्हतं, किंबहुना ब्रँड अवेरनेसचा हा प्रकार इतर पक्षांच्या मेंदूला स्पर्श जरी करून गेला असेल तरी पुरे, असे म्हणावे लागेल. इतिहासापासून काँग्रेसचा पंजा जसा देशभर पोहोचला, तसंच आजच्या घडीला भाजपच्या ब्रँड अवेरनेसच्या रणनीतीमुळे त्या पक्षाचं चिन्ह ‘कमळ’ आज काश्मीर ते कन्याकुमारी’पर्यंत ज्ञात झालं आहे. कारण एकच आणि ते म्हणजे पक्ष नेत्यांच्या होकारात्मक आणि नाकाराम्तक टीआरपीचा उपयोग पक्षाच्या चिन्ह प्रचारासाठी पुरेपूर केला गेला आणि दुसरं म्हणजे दूरदर्शी विचार करणारी सर्वोत्तम मार्केटिंग तज्ज्ञांची टीम सोबत असणं, असेच म्हणावे लागेल. कारण मोदी कायमच पंतप्रधान असणार नाहीत हे त्यांना सुद्धा माहित आहे, परंतु कमळ नेहमीच असेल याची काळजी मागील पाच वर्ष चिरंतर घेतली गेली हे वास्तव आहे.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		