रत्नागिरी : खासदार नारायण राणे काल पासून रत्नागिरी जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यावेळी नारायण राणेंनी चिपळूणमध्ये एक सभा आयोजित केली असता त्यांनी मराठा आरक्षणावरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा भूमिकेवर बोट ठेवत शिवसेना पक्ष प्रमुखांवर सडकून टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या मराठा आरक्षणासंबंधित विधानाचा समाचार घेताना राणे म्हणाले की,’मराठा आरक्षणाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा, सरकार त्याला मंजूरी देईल’, असे उद्धव ठाकरे म्हणतात. मात्र, हा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याची मुळात गरज काय? पुढे राणे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेतील कलम १५ व १६ नुसार मागासवर्गीय अहवालाच्या आधारावर राज्य सरकार आरक्षणाबाबतचा निर्णय घेऊ शकते. या सगळ्याची जाण उद्धव ठाकरेंना नाही. कारण त्यांना फक्त टक्केवारीची गणिते समजतात, अशी बोचरी व जिव्हारी लागणारी टीका नारायण राणे यांनी केली.
दरम्यान उपस्थितांना संबोधित करताना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष तसेच खासदार नारायण राणे यांनी थेट कोकणवासीयांना आवाहन केलं की,’ कोकणी माणसाने आता शिवसेनेची साथ सोडावी’. नारायण राणे सध्या पक्ष बांधणी तसेच कोकणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेळावे आयोजित करण्यावर अधिक भर देताना दिसत आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातील राजकीय वातावरण शिवसेनेसाठी पोषक राहिलेलं नाही आणि त्याचा आगामी निवडणुकीत नारायण राणे पुरेपूर फायदा उचलतील असं स्थानिक राजकीय विश्लेषकांच मत आहे.
