नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सध्या २ दिवसांच्या यूएई अर्थात दुबईच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, दुबईतमधील विमानतळावर मोठ्या उत्साहात राहुल गांधी यांचे जंगी स्वागत करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी विमानतळावर मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमला होता जो मोठं मोठयाने ‘राहुल-राहुल’ अशी घोषणाबाजी करत होता.
दुबई आणि अबुधाबीमधील दौऱ्यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी येथील भारतीय समुदायाला एका कार्यक्रमादरम्यान संबोधित करणार आहेत. त्याप्रमाणे, इथल्या विद्यार्थी तसेच उद्योगपतींशी चर्चा सुद्धा करणार असल्याचे वृत्त आहे. राहुल गांधींचा या वर्षातील हा पहिलाच परदेश दौरा आहे. त्यांच्यासोबत, भारतातील मोबाइल क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा आणि केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी सुद्धा दुबईत उपस्थित आहेत.
विशेष म्हणजे काँग्रेसकडून राहुल गांधींचा दुबई दौरा हा राजकीय नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, दुबईमध्ये असणाऱ्या भारतीयांना येणाऱ्या अनेक अडचणी राहुल गांधी या दौऱ्यात ऐकून घेणार असल्याचे समजते. तसेच, येथील भारतीयांच्या समस्या थेट भारताच्या संसदेत ते मांडणार आहेत.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		