मुंबई : विजय मल्ल्याचे लंडनमधून भारतात प्रत्यार्पण होण्याआधीच त्याला सज्जन असल्याचा दाखल देण्यास भाजपकडून सुरुवात. कारण खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीच बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून आणि देशातून पलायन कडून लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या मल्ल्याची पाठराखण केली आहे.
मुंबईतल्या एका कार्यक्रमात त्यांनी संबंधित विषयाला अनुसरून हे वक्तव्य केलं आहे. प्रत्येक धंद्यात जोखीम ही असतेच. मग ते बँकिंग क्षेत्र असो किंवा कोणताही व्यवसाय चढ-उतार हे निश्चित येणार. मात्र झालेल्या चुका जर प्रामाणिक असतील, तर त्या मोठ्या मनाने माफ करून संबंधित व्यक्तीला दुसरी संधी द्यायला हवी, असं गडकरी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले.
राज्य सरकारच्या सिकॉम या कंपनीनं सुद्धा विजय मल्याला कर्ज दिलं होतं. त्यानं ते ४० वर्षांपर्यंत व्याजसकट पैसे भरले. परंतु, दुर्दैवाने एव्हिएशन व्यवसायात आलेल्या घसरणीनंतर विजय मल्याला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला होता. आणि त्यामुळेच त्याला कर्ज चुकवने शक्य झाले नाही. त्याने चाळीस वर्षे व्याजासकट पैसे परत केले, मात्र त्याला काही हफ्ते आर्थिक अडचणींमुळे फेडता न आल्यानं थेट घोटाळेबाज कसं ठरवता येईल, असा प्रश्न उपस्थित केला.
विजय माल्या असो किंवा नीरव मोदी जर या लोकांनी खरोखर घोटाळे केले असतील तर त्यांना नक्कीच तुरुंगात पाठवायलाच हवे. परंतु एखाद्या आर्थिक संकटात अडकलेल्या व्यक्तीला आपण थेट घोटाळेबाज घोषित करणं कितपत योग्य आहे. त्यामुळे अशा विचाराने भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती होणार नाही, असं सुद्धा नितीन गडकरींनी बोलताना स्पष्ट केलं आहे.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		