अहमदाबाद : बलात्काराच्या घटनेनंतर गुजरातमधील वातावरण यूपी-बिहारींच्या विरोधात प्रचंड तापले असून उत्तर भारतीय आणि बिहारच्या कामगारांनी मिळेल त्या गाडीने पळ काढण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांकडून सुद्धा सध्या अनेक ठिकाणी फ्लॅगमार्च करण्यास सुरुवात केली आहे. गुजरातचे डीजीपी शिवानंद झा यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारे हल्ला झाल्याने आतापर्यंत एकूण ४२ गुन्हे दाखल झाले असून ३४२ जणांना अटक करण्यात आली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, हिंसेच्या भीतीने परराज्यांतून विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या कामगारांनी गुजरातच्या अनेक भागातून पलायन करण्यास सुरुवात केली आहे.

बुधवारपासूनच गुजरातच्या गांधीनगर, मेहसाणा, पाटन, साबरकाठा ते अगदी अहमदाबाद या पाच जिल्ह्यांमध्ये यूपी तसेच बिहारींविरोधात हिंसक आंदोलनांनी पेट घेण्यास सुरुवात झाली. त्यामुळे अत्यंत चिघळलेल्या आणि हिंसक झालेल्या परिस्थितीमुळे गुजरातमधील अनेक उत्तर भारतीय आणि बिहारच्या कामगारांनी मिळेल त्या गाडीने पळ काढला आहे. मेहसाणा आणि साबरकाठा या दोन जिल्ह्यांमध्ये परिणाम सर्वाधिक तीव्र दिसत होते, तर अहमदाबाद येथून आतापर्यंत ७३ आणि गांधीनगर येथून २७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. समाज माध्यमांवर चिथावणीखोर पोस्ट व्हायरल केल्या प्रकरणी सुद्धा ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

परप्रांतीय ज्या भागात मोठ्या संख्येने कामगार रहातात तिथे पोलिसांच्या विशेष गस्त वाढवल्या असून परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन गुजरात पोलिसांना सतर्कतेचा आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. रविवारी वघोडिया इंडस्ट्रियल परिसरात २ कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीयांवर कोटांबी आणि कामरोल गावातील १७ जणांनी हल्ला केला, तसंच न्यू रानिप परिसरातही हल्ला झाल्याची माहिती आहे. चिमुकलीवरील बलात्कार प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात रविंद्र साहू या आरोपीला अटक केली. रविंद्र साहू हा मूळचा बिहारचा आहे हे समोर येताच, त्याच्या अटकेनंतर गुजरातमध्ये उत्तर भारतीय आणि बिहारच्या कामगारांवर हिंसक हल्ले होण्यास सुरुवात झाली.

violence in gujarat against up and bihar people after rape of 14 month old baby many up bihari migrants left the Guajrat