'किन्नर'

शहराच्या बरोबर मधोमध चौधरी कुटुंब राहायला होत..शिवा, त्याची पत्नी कल्पना, दोन मुले कैलास आणि विलास आणि म्हातारी आई असं पंचकोनी मध्यमवर्गीय कुटुंब. शिवा सरकारी कंत्राटदार म्हणून काम पाहत होता त्यामुळे घरात बऱ्यापैकी पैश्याची रेलचेल असायची. कल्पना ब्युटी पार्लर चालवायची. त्यामुळे शहरातल्या जवळपास सगळ्या महिलांसोबत तिचा परिचय होता. कैलास आठवीला तर विलास सहावीला होता..एकंदरीत सगळं कुशल मंगल होत.
एक दिवस कल्पनाला पार्लर मध्ये काम करत असताना चक्कर आली आणि ती कोसळली…डॉक्टर कडे नेण्यात आलं आणि घरात पुन्हा एकदा पाळणा हलणार हे कळलं .. सुनेची दृष्ट काढून कपाळावर कडकड बोटं मोडत सासूबाई म्हणाल्या ” पुन्हा एकदा माझ्या झोळीत नातू टाक हो..म्हणजे माझी ब्रह्म, विष्णू आणि महेश असं त्रिकुट पूर्ण होईल..”
कल्पना शिवाकडे पाहून गोड हसली.. कल्पनाच वय आता गरोदरपणासाठी थोडं जास्त होत त्यामुळे डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला..
बघता बघता नऊ महिने नऊ दिवस वाऱ्यासारखे उडून गेले. आणि आजीच्या भेटीला तिचा तिसरा नातू जन्माला आला. सगळीकडे आनंदी आनंद पसरला..मोठ्या हर्षाने मुलाचं नाव ‘हर्षद’ ठेवण्यात आलं.
हर्षद आपल्या दोन भावांबरोबर हसत खेळत मोठा होऊ लागला. त्यांचीच पुस्तके, खेळणी, कपडेही वापरू लागला..सगळ्यात लहान असल्यामुळे हर्षद सगळ्यांचाच लाडका होता. पण हर्षद आणि त्याच्या भावांच्या वयात बरंच अंतर असल्यामुळे हर्षद सोबत खेळायला घरात कुणी नव्हतं. त्यामुळे हर्षद कॉलोनीतल्या मुलांसोबत खेळायचा..त्यात ४ मुली आणि हर्षद सोडून २ मुले होती..
हर्षद आता पाच वर्षाचा झाला होता..सगळं बोलू शकत होता.त्याचा पाचवा वाढदिवस थाटामाटात साजरा करायच ठरवलं.. हर्षद नि हट्टच धरला कि त्याला त्याच्या बाजूच्या प्रीतीसारखा परीचा फ्रॉक हवा आहे.. त्यासाठी अक्षरशः त्याने घर डोक्यावर घेतलं. शेवटी बालहट्ट म्हणून कल्पना आणि शिवाने त्याला फ्रॉक घेतला..कौतुकाने त्याचे फोटो हि काढून घेतले..
पण त्यादिवसांतर हर्षदला मुलांच्या कपड्यांपेक्षा मुलींचे कपडे जास्त आवडू लागले,..शाळेतही हर्षद लावणी सारख्या गाण्यावर नृत्य करू लागला…
दिवसेंदिवस हर्षदच असं वागणं वाढत चाललं होत. सुरवातीला सगळे गंमत म्हणून दुर्लक्ष करत होते.पण आता हर्षद बारावीला होता. त्याला अभ्यासाची गोडी तर होतीच याशिवाय तो मेहंदी पण सुंदर काढायचा..कैलासच्या साखरपुड्यात त्याने कल्पनाच्या हातावर मेहंदी काढून दिली होती आणि ती एवढी सुंदर झाली होती कि त्यानंतर हर्षदला सगळे ‘मेहंदी किंग’ म्हणून ओळखू लागले..
पण त्यानंतर हर्षदच शाळेतील जीवन मात्र कठीण झालं..त्याच्या पाठीमागे चिडवणारे त्याला “ए हर्षदा..” म्हणून चिडवू लागले. आणि यात भरीस भर शाळेतल्या एका उनाड मुलाला हर्षदच्या वहीत एक पान सापडलं त्यात हर्षद ने एक कविता लिहली होती. हर्षदला त्याच्याच वर्गातला सागर आवडायचा. त्याच रांगडेपण, त्याच शरीर यावर हर्षद मोहित झाला होता, पण त्याने ते कधीच कुणाला कळू दिलं नव्हतं…पण आज सागरच नाव लिहून हर्षदने लिहलेली ती कविता त्या मुलाच्या हाती सापडली होती.. हाहा म्हणता हि बातमी पूर्ण शाळेत पसरली . आणि हर्षदला सगळे ‘किन्नर’ म्हणून ओळखू लागले.
सागर ला फार ओशाळल्या सारखं झालं होत. मुलं त्याच्याही कडे विचित्र नजरेने बघत होते. पण आपला याच्याशी काहीच संबंध नाही हे सिद्ध करण्यासाठी तो सर्वांसमोर हर्षदला घालून पाळुन बोलला आणि हातही उगारला.
हर्षदचे आधीच फारसे मित्र नव्हते. पण आता तर तो ज्या बाकावर बसत असे तिथला मुलगा उठून जायचा. एवढंच नाही तर हर्षद सोबत बोलणाऱ्यासोबत कुणी बोलत नव्हतं त्यामुळे सगळे हर्षदपासून लांब राहायचे. तरीही काही मुलं मुद्दाम हर्षद जिथे बसला असेल तिथे जाऊन ओरडायचे..चिडवायचे . हर्षद एकटा पडला होता..त्याला कॉलेज नको वाटत होत..
जेव्हा हर्षदच्या घरी माहित पडलं कि हर्षदच एका मुलावर प्रेम आहे.. सगळ्यांना तर धक्काच बसला..आजी कल्पनालाच दोष देऊ लागली…” तुझ्यामुळे असली थेर सुचतंय याला..दिवसभर नट्टापट्टा करत असते…फ्रॉक नाही का घालून दिला होता याला..तुझीच फूस असणार ..”
कल्पना तर हुमसून रडत होती..कुठल्या जन्मच पाप म्हणून हे असलं कार्ट आपल्या पदरी पडलं म्हणून देवाला दोष देऊ लागली. शिवा आणि कैलास ने लाथाबुक्क्यांनी हर्षद लामारलं…कुणी अडवायलाही आलं नाही… हर्षद ला एका खोलीत कोंडून ठेवलं..
“दोन दिवस उपाशी राहील तर सगळी अक्कल ठिकाणावर येईल… हे मोबाईल वर काही बाही बघतं आणि मग असले नाटक सुचतात कार्ट्याना….” शिवा ओरडत होता. आणि खबरदार कुणी ह्याच्याशी बोललं आणि कुणी याला खायला घातलं तर..माझ्यापेक्षा वाईट कुणी नसेल.
आणि खरोखर हर्षद ने ते २ दिवस अन्नावाचून काढले..सगळ्या अंगावर व्रण उमटले होते.त्याला फार अशक्तपणा आला होता. दोन दिवसानंतर त्याच्या खोलीचा दरवाजा उघडण्यात आला पण आता त्याची आई सोडून इतर सगळ्यांच्या नजरेत त्याला स्वतःबद्दल किळस दिसून आली जी आजपर्यँत तो शाळेतल्या मुलांच्या नजरेत बघत होता.त्याला स्वतःच्या घरातही परकं वाटायला लागल.
त्यादिवसांतर शिवा, कैलास आणि विलास ने हर्षद सोबत बोलणं जवळपास बंदच केलं होतं..हर्षदच चालणं, त्याच बोलणं, त्याची काम करायची पद्धत फार नाजूक होतं होती आणि आता यासाठी तो दररोज ओरडा खात होतं . आणि एक दिवस… जोरजोरात टाळ्या पिटत किन्नर लोकांची टोळी चौधरींच्या अंगणात आली..
कल्पना तिच्या पार्लर मध्ये होती..तो आवाज ऐकून तिच्या काळजात धस्स झालं आणि ती बाहेर आली..
“क्यू री …कहा छुपा रखा है मेरा हिरा…लेके आ जल्दी ..मैं लेणे को आई उसको..”
“कोण हवंय तुम्हला? इथे कुणी तुमच्यातलं राहत नाही.” कचरतच कल्पना म्हटली.
“आमच्यातलं मतलब..देख बाई तुम्हारी जैसे लोग हमको दुनियासे अलग करते है..तू टाइम खोटी मत कर रे..तू बता मेरे को..कहा है तेरा लडका ?” तिचा आवाज आता वाढला होता..तेवढयात शिवा बाहेर आला
“तुला एकदा सांगून कळत नाही का? इथे कुणी नाही आहे..असली मर्दांचं घर आहे हे..इथं असली खेचर पैदा होत नाही आणि झाली तर उभा कापून काढेल मी” शिवा.
“हाई रे मेरा मरद …जैसे कि किसी को कुछ मालूम हि नही..” त्यांचे हातवारे आणि बोलणं बघून शिवाची आई ” राम राम’ म्हणत घरात निघून गेली..
हर्षद घरातच होता..पण तो फार घाबरून गेला होता त्यामुळे तो बाहेर पडलाच नाही. कैलासने त्याच्या खोलीला बाहेरून कडी घातली होती हे त्याला माहीतच नव्हतं. हे लोक आपल्याला का घ्यायला आले? आणि हे कुठे घेऊन जाणार? अश्या अनेक प्रश्नांनी तो कावराबावरा झाला.
शिवा आणि आलेल्या टोळीची बराच वेळ बाचाबाची झाली..शिवाने पाच हजार रुपये त्यांच्या हातात कोंबले आणि निघून जाण्यास सांगितलं.
“अभि जा रही हम लोग..लेकिन जब समाज कि डर से ‘तेरी फटेगी ना तब उसको मत मारना ..मैं पालेगी उसको,आयेगी मैं..”
तिने एक कटाक्ष हर्षदच्या खोलीकडे टाकला..खिडकीतून बघत असलेला हर्षद जाग्यावरच गार झाला. आणि रडायला लागला..त्याच रडणं बघून शिवाला राग अनावर झाला.
“रडायला काय झालं रे बायकांसारखं ?” असं म्हणून शिवाने हर्षदच्या कानाखाली वाजवली!!
दिवसेंदिवस घरच्यांचं हर्षदप्रती वागणूक बदलत होती. आजीला तर हर्षदचा स्पर्शही नको होता. बघता बघता हर्षदच्या किन्नर होण्याची गोष्ट कैलासच्या सासरीही पोहचली आणि त्यांनी लग्न मोडलं. त्यामुळे कैलास दातओठ खाऊन हर्षदचा राग करू लागला होता. हर्षदला घर नकोस झालं होत.
असच एक दिवस हर्षद शाळेत असताना त्यादिवशी घरी आलेली एक किन्नर त्याला भेटायला शाळेत आली. . तिला बघून तो घाबरला पण तिने त्याची मायेनी चौकशी केली.. हर्षदला तो आपलंसं वाटला. त्याने त्याला आपल्या सोबत चालण्याबद्दल म्हटलं.पण हर्षद नाही म्हणाला .
“चल रे मेरे साथ ….ये दुनिया में ऐसे घुमेगा तो नोच के खायेंगे तुझे…”
“मला नाही यायचं; मी माझ्या आईवडिलांना, माझ्या कुटुंबाला सोडून नाही येऊ शकत”
“काहे हा कुटुंब रे??जो तेरे को हात पैर से मारा..जो तुझे कही ले जाणे से शरामाता है. तेरा बाप तेरसे बात नही करता..सब साले जान के दुश्मन ”
” हे सगळं तुम्हाला कस माहित?”
“हम सबका एकही रोना है, तू हमसे अलग थोडी है ”
तिचा पेहराव आणि तीच हे बोलणं ऐकून हर्षद ला कसकसच झालं. त्यानं पुन्हा सोबत चालण्याबाबदल म्हटलं पण हर्षद गेला नाही. त्यानंतर त्यातले बरेच जण अधूनमधून हर्षद ला भेटत होते. बोलायचे,,त्याची मायेनी विचारपूस करायचे आणि सोबत चल म्हणायचे. पण हर्षद जायला तयार नव्हता.
त्यादिवशी हर्षदच्या बाजूच्या घरी लग्नाच्या आधी संगीत चा कार्यक्रम होता. हर्षदच्या घरी हर्षद सोडून सगळ्यांना आमंत्रण होत. हर्षदला आता हे सवयीचं होत. तो टीव्ही बघत घरीच थांबला.. टीव्हीवर एक मुलगी छान साडी घालून नटीला होती ते बघून आपणपण असाच शृंगार करावा अशी हर्षदची इच्छा झाली. सगळ्यांना यायला तसही वेळ होता. त्यामुळे त्याने कल्पनाची साडी नेसली आणि पार्लर मध्ये जाऊन छान तयार झाला… चोपून छापून नेसलेली साडी, माथ्यावर लाललाल कुंकू, केसांमध्ये माळलेला गजरा, हातात हिवागार चुडा, नाजुकशी कंबर, चालण्यातली अदब हे सगळं बघून एखादी अप्सराही लाजली असती एवढा सुंदर हर्षद दिसत होता. तो स्वतःलाच न्याहाळत आरश्यात बघत लाजत होता आणि तेवढ्यात काही कामानिमित्त शिवा घरी आला…आणि हर्षदला असं बघून त्याची तळपायातली आग मस्तकात गेली..आता याक्षणी हर्षदचा गळा घोटावा असं त्याला वाटलं. आणि तेच करण्यासाठी तो हर्षदच्या अंगावर धावून गेला..
हाताला लागेल ते घेऊन तो हर्षदला मारत होता..शिव्या देत होता..
“साला छक्का,, माझ्या घरात जन्मून माझं नाव धुळीला मिळतोय..फुकटच खातोय न माझ्यावरच उडतोय…आज तुला जिवंत सोडत नाही..” शिवाचे हात आणि तोंड दोन्ही हर्षदवर सपासप वार करत होते..त्याची शुद्ध हरवली पण शिवाचे शब्द कानात उकळत्या तेलासारखे पडत होते.
जेव्हा जाग आला तेव्हा हर्षद एका हायवे ला पडलेला होता, अति मारहाण माझ्यामुळे त्याची शुद्ध हरवली होती, कपडे ठिकठिकाणी फाटले होते,, त्याला पुरत कळून चुकलं होत कि आपल्या घरच्यांनीच आपल्यला इथे सोडलं म्हणून..पण हर्षदच दैव बलत्तर म्हणून एका गाडीवाल्याने त्याला उचलून हॉस्पिटल मध्ये नेलं.. हर्षदला त्याच नाव आणि घरच्यांबद्दल विचारलं.
“हर्षद शिवा चौधरी” हे बोलणारच पण जस शिवा शब्द उच्चारला पाठीवरच्या व्रणातून एक जोरदार कळ निघाली .
त्याने फक्त स्वतःच नाव सांगितलं..आणि ओळखींमध्ये त्याला भेटायला येणाऱ्या किन्नरचं नाव आणि नंबर सांगितला.. त्या व्यक्तीने त्या नंबर वर फोन करून हर्षद बद्दल माहिती दिली..
थोड्याच वेळात तो हर्षदला घ्यायला आला. आणि अश्याप्रकारे हर्षद किन्नरांच्या वस्तीमध्ये आला..
शहराच्या दूर त्यांची वस्ती होती..एक रूम चे घर..कुठे लाईट होती तर कुठं नाही, फारसा प्रकाशही नव्हता..कुणी साडी घालून होत, तर कुणी ड्रेस, काहींनी भडक मेकअप केला होता तर काही साध्या..काहींच्या दरवाज्याजवळ पुरुष होते , त्यांचे अश्लील हावभाव बघून हर्षदने दुसरीकडे बघितलं… त्याला घेऊन आलेल्या किन्नरचं नाव अंबिका होतं. प्रौढ आणि तेवढीच मायाळू. बहुतेक या वस्तीची तीच नायक होती.. ती हर्षदला घरात घेऊन गेली,त्याला खाऊ घातलं आणि औषध देऊन झोपवलं.
हर्षद तिथेच राहू लागला. त्यांच्यात मिसळू लागला..त्यांची भाषा, राहणं आत्मसात करू लागला. इथे त्याला कसलं बंधन नव्हतं. तो आवडीने साडी नेसत होता, शृंगार करत होता. आईच्या पार्लरमध्ये बघून त्याला छान तयारी करता येत होती, त्यामुळे तो इतर किन्नरला तयारही करून देत होता.
पण इथे येऊन त्याला कळलं कि किन्नरचं जीवन किती कठीण असत. नोकरी कुणी देत नाही, समाजात मान नाही, कुणी कामावरही ठेवायला तयार नाही, त्यामुळे उत्पन्नाचे साधन नाही. पण पोट तर प्रत्येकाला असत, आणि भूकही लागते.. त्यामुळे भुकेसाठी शरीर विकलं जात,पण त्यातही गोडवा नसतो.. विकत घेतलेल्या वस्तूवर आपला अधिकार असल्यावर जस वापरतात तस कुस्करून सोडायचे माणसं . पण नंतर नंतर सवय होऊन जायची..लग्नात, जन्माच्या वेळी बँड घेऊन जायचं आणि आशीर्वाद द्यायचे तर लोक शे दोनशे झोळीत टाकायचे. नाही म्हणायला मग ट्रेन मध्ये फिरायचं नाहीतर सिग्नल आहेच..
हळूहळू हर्षद या सगळ्याचा भाग बनून गेला होता. हर्षद च नामकरण होऊन आता ‘निशा’ ठेवलं होत. त्याने केस वाढवले होते, मुळातच सुंदर असणारा हर्षल आता सुंदर निशा झाली होती. तो लग्नकार्यात,, मुंजेला आशीर्वाद द्यायला जात होता. किन्नर परंपरेनुसार निशाच एका रात्रीसाठी त्यांच्या देवता अरावन सोबत लग्न करण्यात आलं आणि रितीनुसार निशाच किन्नर परिवारात स्वागत झालं.
निशा आता तिच्या जीवनात रमली होती..लोकांच्या किळसवाण्या नजरा, अपमान या सगळ्याची सवय झाली होती पण घरी आल्यानंतर मात्र ती यातून मुक्त असायची.कमीत कमी घरी ते सगळं सहन करावं लागत नाही म्हणून ती समाधानी होती.
एक दिवस निशा आणि तिच्या काही सोबती एका लग्नात गेल्या.. अपेक्षेपेक्षा कमीच पैसे मिळाले. बाजूलाच आणखी एक लग्न होत. थोडे जास्त पैसे मिळतील म्हणून कुणाचं लग्न आहे हे न बघताच ते मंडपात गेले..
जोरजोरात टाळ्या वाजवत निशा वर वधूकडे होती..
“फुलों फलो…मेरी उमर दोनो को लगे..हाय रे मेरा हिरो…” असं म्हणून तिने नवऱ्या मुलावर नजर टाकली आणि ..
कैलास ला बघून ती स्तब्ध झाली..कैलास ला हि निशाच्या रुपातला हर्षल ओळखायला फार उशीर लागला नाही..त्यांनी खुणेनेच वडिलांना सांगितलं.
हर्षल जिवंत आहे आणि तो असे काम करतो ते बघून शिवाचे डोळे लालबुंद झाले होते. त्यांच्यामते त्यादिवशी हर्षल ला एखादी गाडी चिरडून गेली होती आणि त्यांनी त्याचा अपघात झाला म्हणून अंतिम संस्कार पण केले होते. त्यांच्या होणाऱ्या बदनामीपासून त्यांनी अशी सुटका मिळवली होती आणि त्यानंतरच कैलासच लग्न ठरलं होत.
आणि आज हर्षल निशा बनून त्यांच्या समोर उभा होता…शिवाने निशाच्या हातात पाच हजार कोंबले आणि निघून जायला सांगितलं..निशाला नकळतपणे तो दिवस आठवला ज्यादिवशी किन्नर तिला घ्यायला आले होते.
निशा ने लगेच स्वतःला सावरलं आणि पैसे ब्लॉउज मध्ये ठेवले आणि तेवढ्याच जोराने टाळ्या वाजवत शिवा समोरून निघून गेली.. तिच्या टाळ्यांचा आवाज शिवाच्या कानात घुमत राहिला..
पण निशाचा प्रवास असाच संपला नाही..तिथून बरोबर दोन महिन्याने निशाचा मृतदेह एका नाल्यात आढळला. तिचा पत्ता काढून निशाच्या घरच्यांनीच तिचा निघृण खून करवला होता जेणेकरून पुढे त्यांच्या आयुषयात तिच्यामुळे अडचण यायला नको!!
निशाच्या मृत्यूबद्दल समजताच अंबिका तिचा मृतदेह घेऊन त्यांच्या वस्तीत आली..किन्नर लोकांच्या परंपरेनुसार निशाच्या मृतदेहाला जोड्याचप्पलने मारण्यात आलं. यामुळे या जन्मात केलेल्या पापांपासून मुक्तता मिळते आणि पुढच्या जन्मी किन्नर म्हणून जन्म होत नाही अशी त्यांची समज आहे.ते मृतदेहाला अग्नीही देत नाही आणि शवयात्रा दिवसा काढत नाही. कारण किन्नरची शवयात्रा किन्नर सोडून कुणी बघितली तर पुन्हा किन्नर म्हंणूनच जन्म होतो अशी भीती त्यांना आहे.आणि किन्नर म्हणून जन्म घेऊन या जन्मी सहन केलेल्या मरणयातना पुढच्या जन्मी कुणालाच भोगायला लागू नये म्हणून ते ह्या परंपरा पाळतात..
रात्र झाली आणि निशा ची जीवनयात्रा कायमची संपली…ती शांतपणे मातीत मिसळली होती. मातीची महानता कि मातीने तिला तिच्या लिंगावरून दूर ढकललं नाही…
टिप –
प्रस्तुत कथा काल्पनिक आहे, किन्नर परिवार आणि त्यांच्या परंपरे बद्दलची माहिती इंटरनेट वरून मिळवली आहे.सादर आभार.
सदर कथेमध्ये कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही, चुकून तसे झाले असल्यास क्षमस्व.
काही लोकांना हि कथा अतिशयोक्ती वाटू शकते, पण अश्या बऱ्याच घटना हि कथा लिहन्यापूर्वी अभ्यास करतांना वाचण्यात आल्या. सगळ्याच किन्नर बांधवाना असं कुटुंब मिळतं नाही पण बऱ्याच जणांची लढाई स्वतःच्या परिवापासूनच सुरु होते.
Writer: Tejal Apale
Laghu Katha English Title: Laghu Katha Kinnar written by Tejal Apale on Maharashtranama.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN