नवी मुंबई : विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. त्यादृष्टीने सर्वच पक्ष आता कामाला लागले आहेत. एकाबाजूला राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधात लढा उभारण्याची तयारी सुरु केलेली असताना, दुसरीकडे पक्षविस्तार देखील जोमाने सुरु असल्याचं पाहायला मिळतं. मनसे अध्यक्षांनी सर्वच जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्तरावर पक्षविस्तार करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या हस्ते नवी मुंबईमध्ये ५ शाखांचे उद्घाटन केले. दरम्यान त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी तसेच पदाधिकाऱ्यांशी संवाद देखील साधला.
तर दुसऱ्याबाजूला याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली याविषयी माहिती मिळू शकलेली नाही, पण येत्या ९ ऑगस्टला क्रांती दिनी ईव्हीएमविरोधात विरोधी पक्ष एल्गार करणार आहेत. त्या अनुषंगाने ही भेट झाल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक काही दिवसात जाहीर होईल. ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात येणार नसेल तर निवडणुकीवर बहिष्कार टाकू अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. परंतु पुण्यात रविवारी शरद पवार यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत बॅलेट पेपरवर निवडणूक नसेल तर बहिष्कार ही राज ठाकरेंची भूमिका आपल्याला मान्य नसल्याचं सांगितलं. जयंत पाटील आणि राज ठाकरे यांच्यात आणखी काय चर्चा झाली? ते समजू शकलेले नाही. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.
दरम्यान ४ ऑगस्टला म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन आल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यात मेळावा आयोजित करण्यात आला आहे आणि त्यावेळी राज ठाकरे नेमकं काय भाष्य करणार याकडे प्रसार माध्यमांचं लक्ष लागून राहील आहे.
