यवतमाळ : यवतमाळच्या जंगलात ३ नोव्हेंबर रोजी अवनी वाघिणीला शार्प शुटर असगर याने गोळ्या घालून ठार मारले होते. परंतु, अवनीच्या मृत्यूनंतर तिच्या २ बछड्याचे दर्शन अनेक दिवसांपासून झाले नव्हते. दरम्यान, अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर जंगलात बेपत्ता आणि भुकेल्या असलेल्या तिच्या २ बछड्यांचे अखेर गुरुवारी यवतमाळमधील जंगलात रस्ता ओलांडताना दर्शन झाले.
पांढरकवड्यातील अवनी वाघीण वनखात्याला ‘टी-१’ हे नावाने परिचित होती. असे असले तरी ही वाघीण आसपासच्या लोकांना ‘अवनी’याच नावाने ओळखत असत. मागील काही वर्षात तिने केलेल्या हल्ल्यात तब्बल तेरा जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर टी-१ वाघिणीला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यासाठी २२ सप्टेंबरपासून महाराष्ट्र राज्याच्या वनखात्याने तब्बल २०० लोकांची टीम नेमून मोहीम सुरू केली होती. दरम्यान, या वाघिणीला ३ नोव्हेंबर रोजी नवाब शफात अली खानचा मुलगा असगर याने ठार केले. परंतु, अवनीच्या मृत्यूनंतर तिच्या २ बछड्याचे अनेक दिवसांपासून दर्शन झाले नव्हते. त्यात वाघिणीचे बछड्यांना शिकार करण्यास शिकण्यासाठी किमान २ महिन्यांचा तरी कालावधी लागतो असं तज्ज्ञ सांगतात.
परंतु, ते स्वतः शिकार करायला शिकत नाहीत तोपर्यंत वाघिणीने केलेल्या शिकारीवर आणि तिच्या दुधावर त्यांचे पोट भरत असते. अवनीने २९ ऑक्टोबरला अखेरची शिकार केली होती. परंतु त्यानंतर तिने एकही शिकार केलेली नव्हती. त्यामुळे तिचे २ लहान बछडे देखील उपाशी असावेत आणि आता तेदेखील अवनीच्या पाठोपाठ भुकेने मृत्यू पावतील की काय, अशी भीती प्राणिमित्रांनी आणि वनखात्याने व्यक्त केली होती. परंतु, गुरुवारी सकाळी यवतमाळमधील जंगलात रस्ता ओलांडताना दर्शन झाले, त्यामुळे प्राणीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
