लखनऊ: भारतातील महत्वाचे आणि ज्वलंत मुद्यांपासून सामान्यांना विचलित करण्यासाठीच जिल्हे आणि शहरांची नावं बदलण्याची उठाठेव मोदी सरकारकडून सुरू आहे, अशा तिखट शब्दांत पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजप सरकारला लक्ष्य केलं आहे. तसेच CBI मधील अंतर्गत वाद, राफेल लढाऊ विमान घोटाळा आणि RBI ची स्वायत्तता असे अनेक गंभीर विषय सध्या आपल्या देशासमोर आहेत. परंतु, केवळ या मुद्यांपासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आता अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा सत्ताधाऱ्यांकडून पुढे रेटला जात आहे असं हार्दिक पटेल यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देशातील वातावरण गढूळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशा शब्दांमध्ये हार्दिक यांनी भारतीय जनता पक्षावर आणि नरेंद्र मोदींवर तोफ डागली आहे. फक्त निरनिराळ्या जागांची नावं बदलून देश सर्वबाजूंनी संपन्न होणार असेल, तर १२५ कोटी भारतीयांचं नाव बदलून आता राम ठेवा, असा सणसणीत टोला सुद्धा त्यांनी भाजपाला लगावला.

यूपीतील योगी सरकारनं काही दिवसांपूर्वीच अलाहाबाद आणि फैजाबादचं नामांतर केलं. त्यानुसार अलाहाबादला प्रयागराज आणि फैजाबादला अयोध्या असं नामकरण करण्याच्या प्रस्तावाला उत्तर प्रदेश सरकारनं अधिकृत मंजुरी दिली आहे. नेमका याच मुद्याला धरून हार्दिक पटेल यांनी भाजप सरकारवर तिखट शब्दात निशाणा साधला आहे. केवळ मुलभूत प्रश्नांपासून सामान्यांचं लक्ष विचलित व्हावं, यासाठी सरकार नामांतराचा खटाटोप करत आहे.

patidar community leader hardik patel slams bjp on changing names of cities and districts