नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्यास आणि लोकसभा निवडणुका घोषित व्हायला तसेच निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास आता केवळ ७० दिवस शिल्लक आहेत. अंदाजे ६ ते ८ मार्चच्या दरम्यान लोकसभा निवडणुकांची अधिकृत घोषणा निवडणूक आयोग करेल, अशी शक्यता आहे. सध्या परदेश दौऱ्यावरून ब्रेक घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ७० दिवसांत देशभराच्या दौऱ्यावर जाऊन नव्या आणि अपूर्ण स्थितीत असलेल्या का होईना अशा विविध योजना आणि प्रकल्पांची निवडणुकीआधी घोषणा करणार असल्याचे वृत्त आहे.
रस्तेबांधणीसह सर्व पायाभूत सुविधा योजनांची कामे घाईघाईत पूर्ण करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. हा सर्व लोकसभा निवडणूकपूर्व खटाटोप केवळ काँग्रेसवर हल्ला चढवण्यासाठी मोदी आखात असल्याचे समजते. दरम्यान, जर निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केली तर कोणत्याही घोषणा करणे शक्य होणार नाही. आणि ज्या घोषणा जाहीर केल्या जातील त्या आम्हीच पूर्ण करू किंवा आम्हाला पुन्हा सत्तेत बसवलं तरंच पूर्ण होतील असा भ्रम मतदाराभोवती निर्माण केला जाईल.
फेब्रुवारीमध्ये सर्व घोषणाबाजीला मोदी जोराने सुरुवात करतील. पुढचे ५० दिवस ते केवळ उद्घाटन, पायाभरणी तसेच नव्या योजना व प्रकल्प यांसाठीच व्यस्त राहणार असल्याचे वृत्त आहे. धक्कादायक म्हणजे नव्या योजना आणि घोषणांसाठी हंगामी अर्थसंकल्पापर्यंत सुद्धा मोदी सरकार तयार नसल्याचे समजते. त्यामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन ८ जानेवारी रोजी पूर्ण होताच, तरुणांना रोजगार, एमएसएमई तसेच अन्य योजना जाहीर करण्यात येतील. कारण, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३० जानेवारी ते १५ फेब्रुवारी या काळात होईल.
पंतप्रधान मोदी लोकसभा निवडणुकीपूर्वी असाच घोषणांचा सपाटा लावून “फिर एक बार, मोदी सरकार” ह्या घोषणा देण्यास सुरुवात करणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, अर्थमंत्री अरुण जेटली आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाची विशेष योजना तयार केली आहे. त्यानुसार “फिर एक बार मोदी सरकार’ ही भाजपाची घोषणा निश्चित झाली असली तरी नरेन्द्र मोदी यांना याहून सुद्धा आकर्षक घोषणा हवी आहे.
