जालना : मी तुम्हाला पैसे देऊ ऱ्हायलो…त्यांना पैसे भेटू नाही राहिले…तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहणारकी नाही, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विचारला. त्यांचे थेट पैशाशी संबध असलेले वक्तव्य सोशल मिडियात व्हायरल झाले आहे आणि त्यामुळे खरंच भाजपला पैशाची किती मस्ती आली आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
रावसाहेब दानवेंना पैशांची मस्ती आली आहे आणि आपण काय बोलतो आहोत हे त्यांना कळत नाही, अशा कठोर शब्दात आमदार बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष कसे आहेत? तेच मला कळत नाही. त्यांना या निवडणुकीत आपण उत्तर जरूर देणार…, असं कडू म्हणाले. शेतकऱ्यांसाठी चुकीची भाषा वापरूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. आपण काय बोलावं याचं भान असलं पाहिजे, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले.
जालन्यात प्रभाग क्रमांक ११ मध्ये विकासकामांच्या बैठकीत दानवेंनी हे वक्त केले आहे. आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे दानवे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून मोकळे झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी देशभरातले चोट्टे एक झालेत आणि जालन्यात मला पाडण्यासाठी जालन्यातले चोट्टे एक झाल्याचा दावा दानवे यांनी या वेळी केला. दानवे यांनी आपल्यावर उपस्थितांना हात वर करून पाठिंबा द्यायला लावला, हा मिळणारा प्रतिसाद पाहून कशाला निवडणूक घ्यायची, असा फाजील आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
