मुंबई : एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या महिला उमेदवारांना अश्लील टिप्पणीला सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजीचा सामना करावा लागला आहे. यावर मातोंडकर यांनी स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस संरक्षणाचीही मागणी केली आहे. या हुल्लडबाजींमध्ये एक महिला प्रवासी पडल्याने जखमी झाली आहे. तर या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे.
बोरिवलीमध्ये सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर या प्रचार करत होत्या. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. तसेच अश्लील नाच करून दाखवत ‘मोदी मोदी’च्या घोषणा दिल्याचा आरोप उर्मिला मातोंडकर यांनी केला आहे. यामुळे तेथील काँग्रेस कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
उर्मिला मातोंडकर या रेल्वे स्थानक आवारात प्रचार करत होत्या. यावेळी अचानक ८ ते १० जण त्याठिकाणी आले. त्यांनी उर्मिला यांच्यासमोरच वेडावाकडा नाच केला. तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत एक पॅसेंजर महिला खाली पडून किरकोळ जखमी झाली. यानंतर बोरिवली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.
