नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीदरम्यान सामान्य व्यक्तीला सरकारनं जोराचा धक्का दिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. घरगुती एलपीजी सबसिडी असलेल्या सिलिंडर गॅसची किंमत ६ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तर सबसिडी नसलेल्या सिलिंडरच्या किमतीत २२.५ रुपयांची वाढ झाली आहे, असं वृत्त द हिंदू बिझनेस लाइननं प्रसिद्ध केलं आहे.
या किमती १ मेपासून म्हणजे आजपासून लागू होणार आहेत. घरगुती गॅसच्या वाढलेल्या किमतीनंतर दिल्लीतल्या रहिवाशांना सबसिडीच्या सिलिंडरसाठी ५०२ रुपये मोजावे लागणार आहेत. तर सबसिडी नसलेल्या सिलिंडरसाठी ७३० पेक्षा अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. १ एप्रिललाही सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या.
तेल कंपन्यांनी सबसिडी नसलेल्या गॅस सिलिंडरच्या किमतीत 5 रुपयांची वाढ केली होती. तर सबसिडीवाल्या सिलिंडरच्या किमतीत २५ पैशांची वाढ नोंदवण्यात आली होती. वर्षाला १४.२ किलोचे १२ सिलिंडर ग्राहकाला उपलब्ध करून दिले जातात. त्यातच सबसिडीचे पैसे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
