
Yatharth Hospital IPO | नुकताच यथार्थ हॉस्पिटल कंपनीच्या IPO गुंतवणूकीसाठी खुला करण्यात आला आहे. बुधवारपासून गुंतवणूकदारांनी IPO मध्ये पैसे लावायला सुरुवात केली आहे. यथार्थ हॉस्पिटल कंपनी आपल्या IPO मध्ये 50 इक्विटी शेअर्सचा एक लॉट जारी केला असून त्यांची किंमत बँड 285-300 रुपये निश्चित केली आहे.
शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 ही IPO ची शेवटची तारीख आहे. यथार्थ हॉस्पिटल अँड ट्रॉमा केअर सर्व्हिसेस कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 687 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रयत्न करत आहे. या IPO मध्ये 490 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकले जाणार आहेत. तर विमला त्यागी, प्रेम टी नारायणसह इतर प्रवर्तकांकडून सुमारे 65.52 लाख इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकले जाणार आहेत.
सध्या ग्रे मार्केटमध्ये यथार्थ हॉस्पिटल कंपनीचे IPO शेअर्स 75 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच हा 375 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. यथार्थ हॉस्पिटल कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 205.96 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. यासाठी कंपनीने 300 रुपये प्रति शेअर किमतीवर अँकर गुंतवणूकदारांना 68,65,506 इक्विटी शेअर्सचे जारी केले आहेत.
कंपनीच्या प्रमुख अँकर गुंतवणूकदारांमध्ये ICICI प्रुडेन्शियल, निप्पॉन लाइफ, HDFC म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला सन लाइफ, बंधन म्युच्युअल फंड, HSBC ग्लोबल इन्व्हेस्टमेंट्स, ट्रू कॅपिटल, कार्लिऑन कॅपिटल, BNP पारिबस, गोल्डमन सॅक्स, ज्युपिटर इंडिया फंड, यासारखे दिग्गज संस्था सामील आहेत.
यथार्थ हॉस्पिटल कंपनीने आपल्या IPO मध्ये 50 टक्के कोटा क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बिडर्ससाठी राखीव ठवेला आहे. तर गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी कंपनीने 15 टक्के कोटा राखीव ठेवला आहे. उर्वरित 35 टक्के कोटा कंपनीने किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. यथार्थ हॉस्पिटल ही कंपनी 2008 साली स्थापन करण्यात आली होती.
ही कंपनी नोएडा, ग्रेटर नोएडा आणि नोएडा एक्स्टेशन याठिकाणी चार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालन करते. यथार्थ हॉस्पिटल कंपनीने नुकताच मध्य प्रदेश राज्यातील ओरछा याठिकाणी 305 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरेदी करून ऑपरेशन्स आणि सेवांचा विस्तार करण्याची योजना आखली आहे.
IPO मधून जमा झालेली रक्कम कंपनी AKS मेडिकल अँड रिसर्च सेंटर आणि रामराजा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटर या आपल्या उपकंपन्यांवरील कर्जाची परतफेड करणार आहे. यासह कंपनी आपले भांडवली खर्च, अजैविक वाढ उपक्रम आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांवर देखील काही रक्कम खर्च करणार आहे.
31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात यथार्थ हॉस्पिटल कंपनीने 523.10 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. यात कंपनीने 65.77 कोटी रुपयये निव्वळ नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षात यथार्थ हॉस्पिटल कंपनीने 405.59 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. यात कंपनीने 44.16 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.