 
						Bank of Maharashtra | सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कर्ज आणि ठेव वाढीच्या बाबतीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. पुणे येथे मुख्यालय असलेल्या बँकेने ठेवी आणि कर्जामध्ये जवळपास 25 टक्क्यांची वाढ नोंदवली, जी एप्रिल-जून तिमाहीत कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेपेक्षा सर्वाधिक आहे. बँकेच्या तिमाही आकडेवारीनुसार बँकेचे सकल देशांतर्गत कर्ज वितरण जून 2023 अखेर 24.98 टक्क्यांच्या वाढीसह 1,75,676 कोटी रुपये झाले.
बँक ऑफ महाराष्ट्र आणि इतर बँकांची स्थिती
बँक ऑफ महाराष्ट्र पाठोपाठ 20.70 टक्क्यांच्या वाढीसह UCO बँक, 16.80 टक्क्यांच्या वाढीसह बँक ऑफ बडोदा आणि 16.21 टक्क्यांच्या वाढीसह इंडियन ओव्हरसीज बँकेचा क्रमांक लागतो. देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया देशांतर्गत पत वाढीत 15.08 टक्क्यांच्या वाढीसह पाचव्या क्रमांकावर आहे. तसेच एसबीआयचे एकूण कर्जवितरण (रु. 28,20,433 कोटी) बँक ऑफ महाराष्ट्राच्या एकूण कर्जाच्या (रु. 1,75,676 कोटी) 16 पट होते.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या ठेवीमध्ये वाढ
ठेव वाढीच्या बाबतीत BoM ने 24.73 टक्क्यांनी वाढ नोंदवली आणि जून 2023 अखेरीस 2,44,365 कोटी रुपये उभारले. आकडेवारीनुसार बँक ऑफ बडोदा ठेवींमध्ये 15.50 टक्के वाढीसह (रु. 10,50,306 कोटी) दुसऱ्या स्थानावर आहे, तर पंजाब नॅशनल बँकेने 13.66 टक्क्यांनी 12,67,002 कोटी रुपयांची वाढ नोंदवली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअर्सची कामगिरी
बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्स आज बाजार उघडताच जवळपास 3 टक्क्यांनी घसरले म्हणजेच बँकेच्या शेअर्समध्ये नफावसूली दिसून आली. सध्या शेअर्स 36.55 रुपयांवर व्यवहार करीत आहे. तर गेल्या एका वर्षात शेअर्स 17.35 रुपयांवरून तब्बल 110 टक्क्यांनी वधारले आहे. यासोबतच गेल्या 5 वर्षात शेअर 18 रुपयांवरून 180 टक्क्यांनी वधारले आहे.
किरकोळ-शेती-एमएसएमई कर्ज वितरणाबाबतीत बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सर्वाधिक 25.44 टक्के वाढ झाली, त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक 19.64 टक्के आणि पंजाब नॅशनल बँक 19.41 टक्के आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आणखी एक बँक ऑफ महाराष्ट्रने एमसीएलआरमध्ये ०.१० टक्के वाढ केली आहे. यामुळे एक वर्षाचा एमसीएलआर ८.५० टक्क्यांवरून ८.६० टक्क्यांवर पोहोचला आहे, असे बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. सुधारित दर १० ऑगस्टपासून लागू होणार आहेत.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		