मँचेस्टर : जागतिक क्रिकेटमधील ‘हायव्होल्टेज’ सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार ८९ धावांनी लोळवले. यासह भारताने विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानवरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करताना त्यांचा या स्पर्धेत सलग सातव्यंदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. भारताने पन्नास षटकात पाच बाद ३३६ धावा उभारल्यानंतर पाकिस्तानचा डाव चाळीस षटकात ६ बाद २१२ धावांत रोखला गेला. दरम्यान पावसाच्या व्यत्ययानंतर पाकला अखेरच्या ५ षटकात १३६ धावांचे ‘सुधारित’ आव्हान मिळाले होते. परंतु त्यांना केवळ ४६ धावाच करता आल्या. सर्वात महत्त्वाचे या धमाकेदार विजयासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकविरुद्ध झालेल्या पराभवाची व्याजासहीत परतफेडही केली.

वरुण राजामुळे अनेकदा खेळ थांबविण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार चाळीस षटकात ३०२ धावांचे आव्हान मिळाले आणि तेव्हा पाकिस्तानने ३५ षटकात ६ बाद १६६ धावा केल्या होत्या. हे आव्हान अवाक्याबाहेरचे ठरल्याने नंतर पाकने विजयाचे सर्व प्रयत्नही सोडले आणि केवळ सामना पूर्ण होण्याची औपचारिकता शिल्लक राहिली होती.

धावांचा पाठलाग करताना फखर झमान (६२) आणि बाबर आझम (४८) यांचा अपवाद वगळता पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला चमक दाखवता आली नाही. इमाम उल हकला (७) विजय शंकरने बाद केल्यानंतर झमान-आझम यांनी १०४ धावांची भागीदारी केली. परंतु, यानंतर पाकिस्तानने ४८ धावांत ५ फलंदाज गमावले आणि सामना भारताच्या बाजूने झुकला.

विश्वचषकात पाकिस्तानला सातव्यांदा लोळवलं, भारताचं वर्चस्व कायम