
UPI ID | सध्याच्या काळात कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर लोक रोख पैसे देण्याऐवजी यूपीआय माध्यमातून पैसे पाठवण्याचा साधा पर्याय निवडतात. त्याचबरोबर ऐन वेळेला खिशात पैसे नसल्याने यूपीआय माध्यमातून पैसे पटकन पाठवता येतात. अगदी भाजीवाल्यांपासून ते मोठमोठ्या मॉलमध्ये क्यू आर कोड स्कॅनर पाहायला मिळतात. ग्राहक क्यू आर कोड स्कॅन करून यूपीआय माध्यमातून पैसे पाठवतात.
तुम्ही यूपीआयच्या माध्यमातून फोन पे, पेटीएम, गुगल पे यांसारखे एप्लीकेशन वारंवार वापरता. या ॲप्सच्या माध्यमातून तुम्ही समोरच्या व्यक्तीपर्यंत कितीही मोठी रक्कम चुटकीसरशी पोहोचवू शकता. आतापर्यंत UPI सुविधेने सर्व प्रकारचे ट्रांजेक्शन मोफत ठेवले होते परंतु आता तसं नसणार आहे. तुम्हाला आता यूपीआय व्यवहारांसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल परंतु हे खरं आहे. एवढेच नाही तर एका कंपनीने यूपीआय व्यवहारांमागे शुल्क आकारण्यास सुरुवात देखील केली आहे.
गुगल पे ने ग्राहकांकडून वसूलले 15 रुपये :
गुगल पे सारख्या कंपन्या रिचार्ज करण्यासाठी आधीपासूनच वेगवेगळे चार्जेस आकारत आहेत. परंतु आता केवळ रिचार्ज वरच नाही तर गुगल पे ने केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर देखील चार्जेस लावण्यात आले आहेत. माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार असं समजून आलं आहे की गुगल पेच्या माध्यमातून पाणी बिल भरलेल्या ग्राहकांकडून 15 रुपये एक्स्ट्रा चार्जेस घेतले जात आहेत. एका यूजरकडून क्रेडिट कार्डच्या माध्यमातून हे बिल भरले गेले असल्याचे समजत आहे.
देशात दिवसेंदिवस UPI चा पर्याय वाढत आहे :
क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यांच्या नावाखाली गुगल पे कंपनीने प्रोसेसिंग फी स्वरूपात वसुली चालू केली आहे. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जीएसटीचा देखील समावेश आहे. सध्याच्या काळात केवळ भाजीपाला आणि साध्या दुकानांमध्येच नाही तर, डीटीएच रिचार्ज, पेट्रोल पंप, मोबाईल रिचार्ज, चित्रपटांचे तिकीट, रेल्वेचे तिकीट, विमानाचे तिकीट, मनी ट्रान्सफर, गॅस बुकिंग, ऑनलाइन शॉपिंग ॲप्स, विमा प्रीमियम, मेट्रो कार्ड रिचार्ज यांसारख्या गोष्टींसाठी वापर केला जातो.