मुंबई : भारतीय जनता पक्षात सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या भरतीवरून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा आहेर दिला आहे. मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे. आम्ही त्यांना स्वच्छ धुवून घेतो. पक्षात आल्यानंतर क्लीन चिट देतो. नंतर ते कामाला लागतात, अशी शेलक्या शब्दात खडसे यांनी टीका केली आहे.
जळगाव घरकुल घोटाळ्याचा निकाल, भारतीय जनता पक्षात सुरू इनकमिंग आणि नारायण राणे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश आदी विषयावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. विरोधी पक्षातून भारतीय जनता पक्षात येणाऱ्या नेत्यांविषयी बोलताना खडसे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांसाठी आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे. आम्ही त्यांना स्वच्छ करून घेतो. पक्षात घेतल्यानंतर त्यांना क्लीन चिट दिली जाते आणि त्यानंतर ते आपल्या कामाला लागतात. आमचा पक्ष पार्टी विथ डिफरन्स आहे, असा मुख्यमंत्र्यांना विश्वास आहे. आमच्याकडे येणारे सगळे साधुसंत नाहीत. काही संधीसाधुही आहेत, असे मत खडसे यांनी व्यक्त केले.
तसचे भारतीय जनता पक्षात या नेत्यांचे पक्षप्रवेश होण्यापूर्वी त्यांना वॉशिंग पावडरने धुतलं जातं. क्लीन केलं जातं मग पक्षात घेतलं जातं अशा शब्दात खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. त्याचसोबत नारायण राणेंना भाजपात घेण्यासाठी शिवसेनेच्या दबावाला झुकण्याचं कारण नाही. कोणाला पक्षात घ्यावं हा भारतीय जनता पक्षाचा निर्णय आहे. छगन भुजबळांना शिवसेनेत घ्यावं की नाही हे भाजपा ठरवू शकत नाही तर राणेंना भाजपात घ्यावं की नाही हा निर्णय भारतीय जनता पक्षाचा आहे. शिवसेनेचा नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा विस्तार करण्याचा अधिकार आहे त्यामुळे राणेंना पक्षात घेण्यासाठी कोणाला विचारण्याची गरज नाही असं खडसेंनी सांगितले.
तसेच अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत आहेत यावर १९७८ साली शरद पवारांनी काँग्रेसमध्ये असताना वेगळा पक्ष स्थापन केला. अनेकांना पक्षात घेतलं. यशवंतराव चव्हाण यांना सोडून शरद पवारांनी वेगळी चूल निर्माण केली. त्या काळात जे घडत आहे तेच आज घडत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात हे नवीन नाही. शरद पवारांच्या बाबतीत इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे अस मत एकनाथ खडसेंनी व्यक्त केलं.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		