पंढरपूर: पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला आणखी एक मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. इंदापूरचे माजी आमदार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी सोडून नुकतेच भाजपवासी झालेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आज हर्षवर्धन यांची भेट घेऊन बंद खोलीत त्यांच्याशी खलबतं केल्यानं या चर्चेला बळकटी मिळाली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील हेही उपस्थित होते. त्यानंतर आजच निर्णय घेतो असे सांगून हर्षवर्धन पाटील बावड्याकडे रवाना झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीत इंदापूरची जागा काँग्रेसला सोडण्यात यावी, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीकडे केली होती. मात्र राष्ट्रवादीकडून अद्याप त्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलेला नाही. कारण या मतदारसंघात मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. त्यामुळे ही जिंकलेली जागा सोडण्यास राष्ट्रवादीचा नकार आहे.

दरम्यान, कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापुरात शिवस्वराज्य यात्रा नियोजित नसताना अचानक यात्रा कशी आली? २३ एप्रिलला निवडणुकीचा निकाल लागला असताना आज ४ सप्टेंबर तारीख उजाडली तरी इंदापूरची जागा सोडण्याबाबत एकही वरिष्ठ नेता बोलत नाही. पुलाखालून बरचं पाणी वाहून गेलं आहे. प्रामाणिकपणे काम करूनही राष्ट्रवादीकडून नेहमी अन्याय करण्यात आला. सभ्यपणाचा राष्ट्रवादीकडून गैरफायदा घेण्यात आला असा आरोप त्यांनी केला.

तसेच लबाड, फसवणूक करणाऱ्या माणसांसाठी काम करायचं नाही. आघाडीची बैठक झाली जुन्नरची जागा सुटली तर इंदापुरची जागा का सुटली नाही? त्यामुळे आता निष्ठावान आणि प्रामाणिक माणसांसाठी काम करायचं आहे. भविष्याच्या दृष्टीकोनातून येत्या काही दिवसांत आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे असा संकेत हर्षवर्धन पाटील यांनी दिले.

लबाड, फसवणूक करणाऱ्या माणसांसाठी काम करायचं नाही: हर्षवर्धन पाटील