पुणे: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरुडमधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. कोल्हापूर येथील मतदारसंघातून निवडणूक लढण्याऐवजी चंद्रकांत पाटील सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात होते असं म्हटलं जातं आहे. शरद पवारांचं पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण चंद्रकांत पाटलांना माहित असल्याने त्यांनी सुरक्षित मतदारसंघाचा शोध काही दिवसांपासून सुरु केला होता.
पुण्याच्या मेधा कुलकर्णी या सध्या कोथरुड मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. मात्र हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षासाठी सुरक्षित असल्याने चंद्रकांत पाटलांनी या मतदारसंघावर दावा केल्याचं म्हटलं जातं आहे. मात्र ही चर्चा सुरू होताच चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला ब्राह्मण महासंघाने कडाडून विरोध केला आहे. कारण कोल्हापूरमधील मंदिरातून ब्राह्मण समाजाला हाकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पुण्यातील ब्राह्मण समाज विरोध करणार, अशी आक्रमक भूमिका ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी घेतली आहे.
पुणे शहरातील ब्राह्मण समाज हा नेहमीच भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहिला आहे. मात्र असं असून देखील कोल्हापूर येथील मंदिरातून ब्राह्मण समाजाला हाकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या, दादोजी कोंडदेव आणि गडकरी यांच्या पुतळ्यांना न्याय न देणाऱ्या पुण्याबाहेरील ब्राह्मण द्वेष्टी व्यक्ती जर पुण्यातून उभी राहत असेल तर ब्राह्मण समाज त्याला विरोध करणार,’ असं म्हणत आनंद दवे यांनी चंद्रकांत पाटलांवर सडकून टीका केली आहे.
जातीचं राजकारण करून आरक्षणाचं राजकारण करून खुल्या वर्गातील लोकांना सर्वच संधी नाकारणाऱ्या पक्षाबरोबर जायचे का नाही याचा विचार करावाच लागेल. अन्यथा गरज पडलीच तर ब्राह्मण महासंघाकडून उमेदवारसुद्धा उभे करू,’ अशी आक्रमक भूमिका आनंद दवे यांनी घेतली आहे. त्यामुळे उमेदवारी घोषित होण्याआधीच चंद्रकांत पाटील अडचणीत आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
