नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी काँग्रेस आणि एनसीपी यांच्या नेत्यांमध्ये होणारी बैठक रद्द झाली असून, ही बैठक आज, बुधवारी होणार आहे. शिवसेनेसोबत महाशिवआघाडीत सामील होण्यास काँग्रेसला मुळीच हरकत नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही सोनिया गांधी यांच्याशी या नेत्यांनी चर्चा केली. हिंदुत्वापेक्षा मराठी माणसाचे हक्क ही शिवसेनेची मूळ भूमिका आहे आणि ती आपल्या विचारसरणीच्या आड येणार नाही, असे या नेत्यांनी त्यांना सांगितले, तसेच एकदा किमान समान कार्यक्रम नक्की केल्यानंतर या अडचणी राहणार नाहीत, असे या नेत्यांचे म्हणणे होते. ए. के. अँथनी, के. सी. वेणुगोपाल आदी नेत्यांचा बिगरमराठी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेसोबत जाण्यास विरोध आहे, पण ती भूमिका आता कालबाह्य ठरल्याचे नेत्यांनी सोनिया गांधी यांना पटवून सांगितले.

एकीकडे काँग्रेस आणि एनसीपी’ची आज बैठक पार पडणार आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या आमदारांची भेट घेणार आहेत. यावेळी सरकार स्थापन करण्यात का उशीर होत आहे, याबाबत ते त्यांना माहिती देणार आहेत. तसंच या बैठकीत शिवसेनेची पुढील रणनितीदेखील ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि एनसीपीच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. नव्या आघाडीचं नाव काय असेल? तसंच ३ पक्ष एकत्र आले तर येत्या मुंबई महानगरपालिकेत निवडणुकांची स्थिती कशी असेल, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहे.

महाशिवआघाडीसाठी सोनिया गांधींचा होकार जवळपास निश्चित असल्याचं वृत्त