नागपूर: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली होती. शेतकरी कर्जमाफीबाबत एनसीपी’चे नेते आमदार अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. याच पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात अनौपचारिक गप्पांदरम्यान अजित पवार म्हणाले, शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया २ ते ३ महिन्यात पूर्ण करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर शेतकरी कर्जमाफीबद्दल चर्चा सुरू आहे. त्यामुळे निश्चितपणे भूमिका घेतली जाईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना दुसरीकडे राज्याच्या विकासासाठी पैसा कमी पडला जाऊ नये, याचेही नियोजन सरकारला करावे लागणार आहे. त्यामुळे काही अवधी लागणार आहे. कर्जमाफीचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना व्हावा, हा हेतूही कर्जमाफी देताना जोपासला जाणार आहे. फेबु्रवारी महिन्यानंतर होणाऱ्या नवीन अधिवेशनात आढावा घेऊन यासंदर्भात घोषणा केली जाऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले.

शेतकरी कर्जमाफी कशी द्यायची याबाबत मध्यप्रदेश, राजस्थान यासारख्या राज्यांमधील कर्जमाफीचा अभ्यास सुरु आहे. कर्जमाफी देताना आधार लिंक करुन कर्जमाफी देता येईल का? याची चाचपणी सुरु असल्याचं, अजित पवार यांनी सागितलं आहे.

 

Web Title:  Loan Waiver Process will be Completed within two three Months says NCP Leader Ajit Pawar.

शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया २-३ महिन्यात पूर्ण करणार: अजित पवार