मुंबई : राज्यातील महत्वाच्या सहा महापालिकांच्या पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांनी आपले वर्चस्व अबाधित राखून स्वतःची ताकद सिद्ध केली आहे, परंतु भाजपला या सहाही जागांवर भोपळा हाती लागला आहे.
मुंबई आणि नाशिक महानगरपालिकेतील जागा अनुक्रमे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राखल्या आहेत. काँग्रेसने सोलापूर आणि नगरमधील स्वतःच गड राखले आहेत. तर दुसरीकडे पुणे आणि उल्हासनगरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत सत्ताधाऱयांना चपराक दिली आहे.
परंतु एक विषय ठळक पणे दिसला आणि तो म्हणजे राज्यातील ६ महापालिकांच्या पोटनिवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला आहे. आपल्या प्रतिस्पर्धीच्या जागा खेचून आणण्यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली होती तरीही भाजपला ‘भोपळा’ ही फोडता आलेला नाही. भाजपने केवळ मुंबई सायन मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिला होता. परंतु वस्तुतः तिथे भाजपची जास्त ताकदच नव्हती हे त्या मागचं कारण होत. उर्वरित सर्वच ठिकाणी भाजपने स्वतःच्या जागा वाढविण्यासाठी शक्ती पणाला लावली होती. परंतु हाती काहीच लागले नाही.
