मुंबई : आधीच राज्यातील साखर कारखानदारी आणि साखर उत्पादक संकटात असताना दुसरीकडे पाकिस्तानातून साखर आयात करण्यात आल्याने संतापलेल्या शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी मार्केटमध्ये हल्लाबोल केला. त्यांनी सुमारे ८० साखर व्यापा-यांच्या कार्यालयांत आणि थेट गोडाऊनमध्ये घुसून त्यांनी पाकिस्तानी साखर शोधण्याचा प्रयत्न केला. तसेच पाकिस्तानविरोधात आणि मोदी सरकारविरोधातही कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
मनसे कार्यकर्त्यांचा आक्रमक अवतार पाहून अजून नुकसान होईल या भीतीने आम्ही पाकिस्तानी साखरेची विक्री करणार नसल्याचे लेखी पत्रच ‘बॉम्बे शुगर मर्चंट असोसिएशन’चे अध्यक्ष अशोक जैन यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांना दिले आहे.
तसेच आम्ही स्वतः महाराष्ट्रातील सर्व व्यापा-यांनाही आमच्या असोसिएशनमार्फत लेखी पत्र पाठवून पाकिस्तानी साखरेची विक्री करू नये असे कळवणार असल्याचे जैन यांनी मनसेच्या पदाधिका-यांना सांगितले आहे.
एवढेच नव्हे तर राज्यातील सर्व व्यापा-यांनाही असोसिएशनमार्फत आम्ही पत्र पाठवून पाकिस्तानी साखरेची विक्री करू नये, असे कळवणार असल्याचे ‘बॉम्बे शुगर मर्चंट असोसिएशन’चे अध्यक्ष अशोक जैन यांनी मनसेच्या पदाधिका-यांना सांगितले आहे. पुढे जैन यांनी माहिती दिली की, पाकिस्तानी साखर अद्याप सर्वच व्यापा-यांकडे पोहोचलेली नाही.
बरीच पाकिस्तानी साखर न्हावाशेवा, भिवंडी, कल्याण येथील गोडाऊनमध्ये असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. कोणत्याही गोडाऊनमधून एपीएमसी बाजारात कुठच्याही परिस्थितीत मनसेचे कार्यकर्ते पाकिस्तानी साखर येऊ देणार नाहीत आणि शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, मग त्यासाठी आम्ही कोणती सुद्धा किंमत मोजायला तयार असून आम्हाला कायदा हातात घ्यावा लागला तरी तो निसंकोच घेऊ असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
पाकिस्तानी साखर अद्याप व्यापा-यांकडे आलेली नाही. पण ती न्हावाशेवा, भिवंडी, कल्याण येथील गोडाऊनमध्ये असण्याची शक्यता आहे. त्या गोडाऊनमधून एपीएमसी बाजारात कोणत्याही परिस्थितीत साखर येणार नाही, यासाठी आम्ही फिल्डींग लावली असल्याचे काळे यांनी`सरकारनामा`ला सांगितले. एपीएमसी प्रशासनालाही आम्ही लेखी पत्र देणार असून अशी साखर बाजारात आणू नये, असे कळवणार असल्याचे काळे म्हणाले.
