मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना’मधून आज भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. दहीहंडी उत्सवाच्या दरम्यान मुली पळवण्याच्या बेताल विधानावरुन भाजप आमदार राम कदम यांच्यावर सडकून बोचरी टीका करण्यात आली आहे.

सामनामध्ये उद्धव ठाकरे यांनी राम कदमांचा उल्लेख हराम कदम असा करत बोचऱ्या शब्दांत खडेबोल सुनावले आहेत. ”जिभेचे पट्टे चालविणारे स्त्रियांना पळवून नेणाऱ्या आपल्या आमदाराच्या बेताल बडबडीवर तोंड शिवून बसले आहेत. महाराष्ट्र धर्म बुडाला आहे तो पापी औरंग्यामुळे नव्हे, तर भाजपच्या विकृतीमुळे. ही विकृतीच मुळापासून उखडून फेका. लिंगपिसाटांचे राजकारण संपवायला हवे”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राम कदमांवर सडकून टीका केली आहे.

आजच्या सामना संपादकीयमधील मुख्य मुद्दे;

१. आजच्या युगातही भाजपच्या ‘खिलजी’विरोधात जोहार पत्करण्याची वेळ महाराष्ट्रातील तमाम मायभगिनींवर आली आहे काय?
२. भाजपचे एक आमदार व मुख्यमंत्र्यांचे प्रिय ‘हराम’ कदम यांनी स्त्रीयांच्या बाबतीत अर्वाच्य, मानहानीकारक शब्द उच्चारून मस्तवालपणाचे प्रदर्शन केले आहे. दहीहंडी कार्यक्रमात त्यांनी अत्यंत रुबाबात माईकवरून जाहीर केले की, ‘‘कोणती मुलगी आवडली असेल तर फक्त मला येऊन सांगा. त्या मुलीस उचलून तुमच्या हवाली करतो.’’ ही कसली भोगशाही आमच्या महाराष्ट्रात अवतरली आहे?
३. आई-भगिनी, शेतकरी, सीमेवरील जवानांच्या पत्नींबाबत घाणेरडय़ा शब्दांत उद्धार करणारी जमात भारतीय जनता पक्षात रुजली आहे.
४. सगळय़ांवर आमदार कदम यांनी हरामखोरीचा कळस चढवला आहे. दुसऱ्यांच्या बायका, लेकी, सुना पळवून आणू असे सांगणारा आमदार ज्या पक्षात आजही आहे त्यांना शिवरायांचे नाव घेऊन राज्य करण्याचा अधिकार नाही.

Samana criticised MLA ram kadam today