पुणे : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, शाळांनी सरकारकडे भिकेचा कटोरा घेऊन येण्यापेक्षा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे’, असं विधान केल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. शुक्रवारी पुण्यात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं.

अनेक शाळा आर्थिक मदत मागण्यासाठी सरकार दरबारी भिकेचा कटोरा घेऊन येतात. परंतु, ते शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडे सहज आर्थिक मदत मागू शकतात. आपल्या शाळेला किंवा महाविद्यालयाला मदत करणं हे माजी विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे असे जनप्रबोधिनी शाळेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रकाश जावडेकर म्हणाले. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दरम्यान, जनप्रबोधिनी शाळेच्या विकासात माजी विद्यार्थ्यांच्या असलेल्या सहभागाचं जावडेकरांनी कौतुक केलं. “अनेक विद्यार्थी त्यांच्या शाळांना सढळ हस्ते मदत करतात. जनप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी अजून शाळेच्या संपर्कात आहेत. शाळेची चांगली निगा राखावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत,” असंही जावडेकर म्हणाले.

Central minister prakash javadekar made controversial statement at Pune