बुद्धिबळ म्हंटले कि शंभरातील नव्वद मुलं लांबच राहतात. “हा खेळ फक्त हुशार मुलंच खेळतात..” “फार डोकं लागतं बाबा..” “आपलं काम नाही ते..”, अशी अनेक मतं मांडली जातात. पण गेल्या काही वर्षात बुद्धिबळाबद्दल अशी मतं असलेल्या मुलांची या खेळाशी चांगलीच मैत्री झाली आहे. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तंत्रन्यान. बुद्धिबळ खेळण्यासाठी विविध वेबसाइट आणि एप्स उपलब्ध असल्यामुळे या खेळाने अनेकांना आकर्षित केले आहे. `
“मिल्लेनिअल पिढी” मध्ये जन्माला आल्यामुळे मला पारंपरिक आणि आधुनिक अश्या दोन्ही पद्धतीने बुद्धिबळ हा खेळ खेळता आला. खरंतर पटावर तुमच्या विरोधी खेळाडू समोर बसून हा खेळ खळण्याचा अनुभव अद्भुत आहे. प्रतिस्पर्ध्याच्या चेहऱ्यावरील हावभाव, एखादी चाल चालताना थरथरणारे हात किव्वा चिंतेमुळे कपाळावर फुटणार घाम अश्या अनेक बाबींचे निरीक्षण करून वैचारिक डावपेच आणि रचनात्मक युद्ध लढण्याचा आनंदच वेगळा आहे. ऑनलाईन बुद्धिबळ खेळताना बहुदा या गोष्टी कधीच अनुभवता येत नाहीत.
पण ऑनलाईन बुद्धिबळाने बऱ्याच जणांना या खेळाच्या प्रेमात पाडले आहे. वैयक्तिक प्रशिक्षणाची जागा आता ऑनलाईन ने घेतली आहे आणि हा खेळ समजणं आता अजून सोप्पं झालं आहे. मी गेली दहा वर्षे बुद्धिबळाचे प्रशिक्षण करत आहे, पण गेल्या काही वर्षात त्यात लक्षणीय बदल घडला आहे. ऑनलाईन प्रशिक्षण वर्गामुळे मला जास्त मुलांपर्यंत पोचता आले. फक्त मुंबईमधील मुलांना शिकवण्याची सुरवात आता थेट अमेरिकेत पोचली आहे. तंत्रन्यानाच्या ह्या अविष्कारामुळे मला अनेक शहरातील, राज्यातील आणि देशातील मुलांना बुद्धिबळ शिकवणे आता शक्य झाले आहे.
विर्च्युअल बुद्धिबळ पट आणि स्काईप विडिओ द्वारे बुद्धिबळ शिकणे व शिकवणे फारच सोईचे झाले आहे. विद्यार्थ्यांना एखादी चाल मागे हि घेता येते किव्वा त्या मागील विचार आणखीन सोप्या पद्धतीने समजावून घेता येतात. ऑनलाईन प्रशिक्षणात निरनिराळी सॉफ्टवेर वापरल्याने प्रत्येक चालीचे महत्व विशेष जाणून घेता येते. असे असले तरीही, विद्यार्थ्यांची देहबोली पाहून त्याला एखादी गोष्ट समजली आहे कि नाही हे ठरवणे कठीण जाते. पहिल्यांदा पट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक प्रशिक्षण हाच चांगला पर्याय आहे तरीही खेळाची चांगली जाण असलेल्या खेळाडूंसाठी ऑनलाईन प्रशिक्षण फार उत्तम आहे.
लेखक – अमर गोडबोले,
बुद्धिबळ खेळाडू आणि प्रशिक्षक
