नवी दिल्ली: अदानी समुहाचे सर्वेसर्वा उद्योजक गौतम अदानी यांनी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. फोर्ब्सने जारी केलेल्या नव्या यादीमध्ये देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे पहिल्या स्थानी आहेत. तर या यादीमध्ये अदानींने आठ स्थानांची झेप घेत दुसरे स्थान पटकावले आहे.

फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार ६२ वर्षीय मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही ५१.४ बिलियन डॉलर (अंदाजे ३ लाख ७० हजार कोटी) इतकी आहे. तर दुसऱ्या स्थानी असणाऱ्या अदानी यांची संपत्ती १५.७ बिलियन डॉलर (अंदाजे १ लाख १५ हजार कोटी) इतकी आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या दहामध्ये उद्योजक हिंदूजा बंधू, बांधकाम क्षेत्रातील पलोनजी मिस्त्री, बँकर उदय कोटक, तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे नाव असणारे शीव नादार, गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानिया, गोदरेज कुटुंबिय, पोलाद उद्योजक लक्ष्मी मित्तल, उद्योजक कुमार बिर्ला यांचा समावेश आहे.

इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमधील आघाडीचे नाव असलेल्या गौतम अदाणी यांनी या यादीत उत्तुंग झेप घेतली आहे. आठ पायऱ्या वर चढत अदाणी या यादीत थेट दुसऱ्या स्थानी विराजमान झाले आहेत. भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान आता त्यांना मिळाला आहे. अदाणी यांची एकूण संपत्ती आता १५.७ अब्ज डॉलरवर पोहचली आहे. अदाणी यांच्या उद्योगाच्या कक्षा विस्तारत आहेत. ऑस्ट्रेलियात कोळसा खाण व्यवसायात त्यांनी पाऊल ठेवले आहे. याशिवाय एअरपोर्ट्सपासून ते डेटा सेंटर्सपर्यंतची क्षेत्रे अदाणी समूहाने व्यापली असून त्यातूनच अदाणी यांच्या संपत्तीला नवी उभारी मिळाली आहे.

अजीम प्रेमजी १७व्या स्थानावर फोर्ब्सनुसार, १४ श्रीमंतांच्या संपत्तीत १ अब्ज डॉलरची घट आलेली आहे. गेल्या वर्षी या यादीत ९ अब्जोपती या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत. उद्योगपती अजीम प्रेमजींच्या संपत्तीतही घट झाली असून, मार्चमध्ये त्यांच्या संपत्तीत घसरण आली आहे. त्यांनी मार्चमध्ये संपत्तीचा मोठा भाग दान केलेला आहे. त्यामुळेच या यादीत ते दुसऱ्या स्थानावरून १७व्या स्थानावर गेले आहेत.

मोदींचे मित्र मुकेश अंबानी भारतात सर्वात श्रीमंत तर अदाणी ८ वरून थेट दुसऱ्या क्रमांकावर