मुंबई: सौदी अरेबियातील अराम्कोच्या सर्वांत मोठ्या इंधन शुद्धीकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचा फटका जगभरातील देशांसह भारताला बसायला सुरुवात झाली आहे. १४ सप्टेंबरच्या ड्रोन हल्ल्यानंतर असणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८० रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत.
गेल्या आठवड्यात एकूण सहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर अनुक्रमे १.५९ आणि १.३१ रुपयांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या इंधनाचे दर चढे राहिल्यास येत्या काळात आणखी दरवाढीची भीती व्यक्त होतं आहे. इंधनाच्या किमती वाढ झाल्यास त्याचा परिणाम इतर जीवनावश्य वस्तूंवरही होतो.
अरामकोवर झालेल्या हल्ल्यानंतर पेट्रोल व डिझेलदरात दररोज भर पडत आहे. इंधनदरांत १७ सप्टेंबरपासून सलग सहा दिवस वाढ झाली आहे. रविवारी देशभरात पेट्रोलचे दर २७ पैशांनी तर डिझेलचे दर १८ पैशांनी वाढवण्यात आले. यामुळे मुंबईमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर आता ७९.२९ रुपयांवर पोहोचला आहे. मुंबईतील डिझेलदराने प्रतिलिटर ७०.०१ रुपयांची नोंद केली. नवी दिल्लीमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर अनुक्रमे ७३.६२ व ६६.७४ रुपये नोंदवण्यात आले.
भारताच्या एकूण इंधनगरजेपैकी ८३ टक्के गरज ही आयातीच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. यातही सौदी अरेबिया हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा इंधन पुरवठादार देश आहे. सौदीकडून भारताला दरमहा २० लाख टन इंधनाचा तसेच, दोन लाख टन एलपीजीचा पुरवठा केला जातो. चालू महिन्यात भारताने आतापर्यंत १२ ते १३ लाख टन इंधनाची आयात झाली असून उर्वरित आयातही विनाअडथळा केली जाईल, अशी हमी सौदीने दिली आहे.
