मुंबई : अभिनेत्री कंगणा राणावत हिचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘मणिकर्णिका’चे निर्माते कमल जैन यांना अर्धांगवायूचा झटका आल्याचे वृत्त आहे. कमल जैन यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे समजते. त्यांच्यावर सध्या मुंबईतील कोकीलाबेन इस्पितळात उपचार सुरू असून, त्यांना व्हेंटिलेटरवर मशीनवर ठेवण्यात आले आहे.
कमल जैन हे झी स्टुडिओस व कैरोस कोनटेंट स्टुडिओस सोबत मणिकर्णिका या सिनेमाची निर्मिती करत आहेत. दरम्यान, हा सिनेमा येत्या २५ जानेवारी रोजी सिने रसिकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाच्या केवळ ५ दिवस आधी ही दुःखद घटना घडल्याने सिनेमाच्या संपूर्ण टीमला जोरदार धक्का बसला आहे.
कमल जैन यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात याबद्दलची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. ‘इस्पितळात दाखल होण्याची ही योग्य वेळ नाही. मणिकर्णिकाची संपूर्ण टीम,कंगना, प्रसूनजी, विजेयंद्रजी, शंकर अहसान, अंकिता, मिश्टी आणि इतर सर्वांना मी खूप मिस करतो आहे. परंतु, मी लवकरच परत येईन. तो पर्यंत मी मनाने तुमच्या सोबत सदैव असें. आपण सर्व मागील २ वर्षे मणिकर्णिकाला ब्लॉकबस्टर सिनेमा बनविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. आणि आता तेच स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे.’ असे या ट्विटमध्ये लिहिले आहे.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		