नवी दिल्ली: या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय जनता पक्ष उमेदवारांचा प्रचार केला होता. मात्र त्यांच्या प्रचाराचा भारतीय जनता पक्षाला दिल्लीत विशेष फायदा झाला नसल्याचं निवडणूक निकालातून दिसत आहे. कारण अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीने दिल्लीतील ७० पैकी तब्बल ६३ जागांवर आघाडी घेत भारतीय जनता पक्षाला धक्का दिला आहे.

एकूण जागांपैकी भारतीय जनता पक्षाला अवघ्या ७ जागांवर आघाडी घेता आली आहे. नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतलेल्या विश्वासनगर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा उमेदवाराचा विजय झाला आहे. परंतु, मोदींची दुसरी सभा ज्या मतदारसंघात झाली त्या द्वारकामध्ये आपच्या उमेदवाराने बाजी मारली आहे.

तत्पूर्वी, दिल्ली विधानसभा जिंकण्याचा पण करून भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. मुख्यमंत्री पदाचा कोणताही चेहरा न देता भारतीय जनता पक्षानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. ही झारखंड आणि महाराष्ट्रात आलेल्या अपयशानंतर भारतीय जनता पक्षानं ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची केली. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीपासूनच भारतीय जनता पक्षानं तयारी सुरू केली होती.

आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ट्विट करून अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी मी ‘आप’ आणि अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन करतो. दिल्लीच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे मोदींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

Web Title:  BJP has lost the seats where PM Narendra Modi had took rally.

मोदींनी सभा घेतलेल्या दिल्लीच्या या मतदारसंघातही भाजपचा पराभव