मुंबई: मला आणि ‘एमआयएम’ला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझे ते वक्तव्य हिंदूविरोधी नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे, असे एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी म्हटले आहे. कर्नाटकातील गुलबर्गा येथे जाहीर सभेत पठाण यांनी १०० जणांना १५ कोटी भारी हे वक्तव्य केले होते. त्यानंतर राजकीय वातावरण तापले. यावरती पठाण यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेत मी ते वक्तव्य मागे घेतो असे स्पष्ट केले.

१०० कोटी भारतीयांच्या विरोधात नाही तर १५ कोटी मुस्लीम हे १०० नेत्यांच्या विरोधात आहेत असं बोललो होतो. ते १०० लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा यांच्यातले आहेत. काही पत्रकारही आहेत असाही आरोप वारीस पठाण यांनी म्हटलं आहे. तसंच इम्तियाज जलील यांनीही हा प्रश्न संपला आहे. असं सांगितलं आहे. तसंच आम्ही सर्व धर्मीयांचा आदर करतो असंही वारीस पठाण यांनी म्हटलं आहे.

या मुद्यावरुन पक्षाने त्यांच्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यावर बंदी घातली होती. राजकीय वातावरण तापल्यानंतर राज्य घटनेच्या चौकटीत राहूनच बोलल्याचे सांगत त्यांनी माफी मागणार नसल्याचे म्हटले होते. मात्र शनिवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपले वक्तव्य मागे घेतले.

वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारीला कर्नाटकातल्या गुलबर्गामध्ये भाषण केले. या सभेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवावे लागेल. जी गोष्ट मागून मिळत नसेल, ती हिसकावून घ्यावी लागेल. आता ती वेळ आलेली आहे. आम्ही माता, भगिनींना पुढे करतो, असे ते म्हणतात. आता तर फक्त सिंहिणी बाहेर पडल्या आहेत आणि तरीही तुम्हाला घाम फुटला आहे. आम्हीदेखील त्यांच्या सोबत बाहेर पडलो, तर काय होईल याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा,’ असे वादग्रस्त विधान पठाण यांनी केले. दरम्यान, वारिस पठाण यांच्या या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.

 

Web Title: Story my that statement was not Anti Hindu says MIM Former MLA Waris Pathan.

देशभरातून टीका; अखेर माफी मागितल्यावर वारिस पठाण म्हणाले, जय हिंद!