नवी दिल्ली : भारतीय लष्कर ही ‘मोदी यांची सेना’ आहे, असे धक्कादायक वक्तव्य करणारे युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना माजी लष्करप्रमुख आणि सध्या केंद्रीय मंत्री असलेले जनरल व्ही.के.सिंग यांनी चांगलीच चपराक दिली आहे. भारतीय लष्कराला मोदींची सेना म्हणणे पूर्णपणे चुकीचे असून, अशाप्रकारे भारतीय सैन्याचा अपमान करणारेच देशद्रोही असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनी सिंग यांच्या मुलाखतीचा एक व्हिडाओ आपल्या ट्विटर अकाऊण्टवरून ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये सिंग यांनी लष्कराला मोदींची सेना म्हणणाऱ्या आदित्यनाथ यांचा समाचार घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. ‘अशा प्रकारे जर कोणी भारतीय सेना ही मोदींची सेना आहे असं म्हणत असेल तर ते केवळ चुकीचं नाही तर असं म्हणणारा देशद्रोही आहे,’ असं सिंग या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतात. अहमद पटेल यांनी हा व्हिडीओ ट्विट करत भारतीय जनता पक्षाच्या अशा देशद्रोह्यांवर कारवाई करेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे. अहमद पटेल आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘जनरल व्ही.के.सिंग यांचे वक्तव्य योग्य आहे. जर कोणी भारतीय लष्कराला एखाद्या व्यक्तीचे सैनिक किंवा ‘मोदींची सेना’ असं म्हणून भारताच्या लष्कराचा अपमान करत असेल तर ती व्यक्ती देशद्रोही आहे. मला आशा आहे की भाजपा अशा देशद्रोहींवर योग्य ती कारवाई करेल.’

भारतीय लष्कर हे ‘मोदी यांची सेना’ आहे, असे बेताल वक्तव्य युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी रात्री गाझियाबाद येथे जाहीर प्रचार सभेत केले होते. दहशतवादाला आळा घालण्यात विरोधक अपयशी ठरल्याची टीका करण्याच्या भरात त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर विरोधकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आणि देशभर टीकेचे लक्ष झाले.

भारतीय लष्कराला ‘मोदींची सेना’ म्हणणारेच देशद्रोही माजी लष्करप्रमुख व भाजप नेते व्ही.के.सिंग